
बांधकाम विभाग अन् गुत्तेदार झोपीत
बीड, (रिपोर्टर)ः- कुर्ला ते बीड हा रस्ता दोन वर्षापासून पुर्णतः उखडला आहे. अनेक आंदोलने केल्यानंतर एक वर्षापासून मोठ मोठी खडी अंथरलेली आहे. यातील अर्धी खडी ही उखडून गेलेली आहे. एक वर्षापासून खडी टाकलेल्या रस्त्याला गुत्तेदाराला काम करण्याचा मुहूर्त सापडत नाही की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याला हे काम दिसत नाही. एक महिना भर जरी काम केले नाही तर टाकलेली खडी आणि अर्धी दबलेली खडी हे दोन्ही उखडून जाईल आणि खराब रस्त्यामुळे चालु असलेली एसटी सेवा बंद होईल. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ हा रस्ता दुरूस्त करून काम करावे नसता कुक्कडगावच्या लोकांना बांधकाम विभागासमोर उपोषण करावे लागेल.
कुर्ला, कुक्कडगाव व आसपासच्या अनेक गावातील लोकांना शासकीय आणि खाजगी कामांसाठी वारंवार बीडला यावे लागते. मोठ्या प्रमाणात या मार्गावरून बीडसाठी लोकांची वाहतुक असते. शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थीही याच मार्गाने एसटी बस आणि खाजगी वाहतुकीने येतात. दोन वर्षापुर्वीच हा रस्ता पुर्णतः उखडला होता. त्यामुळे अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्यानंतर या रस्त्यावरील एका वर्षापुर्वी खडी टाकून दबई केली. ती खडी उखडल्यामुळे दुचाकीचे सर्व टायर खराब झाले, चांगले वाहन नेण्यासाठी वाहनधारक धजावत नाहीत. उरली सुरली राहिलेली खडी देखिल एक महिन्याच्या आत उखडून जाईल आणि वाहतुकीसाठी रस्ता निकामी होईल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरूस्त करून डांबरीकरण करावे. नसता कुक्कडगाव सह या भागातील नागरीक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही या भागातील नागरीकांसह गावकर्यांनी दिला आहे.






