
पोलीस-मुंडे कुटुंबियात झटापट, पेट्रोलच्या दोन बाटल्या पोलिसांकडून जप्त
ज्ञानेश्वरी मुंडेंची एसपींसोबत चर्चा, बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद
संवादानंतर ज्ञानेश्वरी मुंडे बेशुद्ध
बीड (रिपोर्टर): महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून कायदेशीर लढाई लढणार्या ज्ञानेश्वरी मुंडे आज कुटुंबियांसमवेत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आल्या. या वेळी त्यांनी कुटुंबासमवेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर अखेर पोलिसांनी त्यांच्याजवळील पेट्रोलच्या दोन बाटल्या आपल्या ताब्यात घेतल्या. या वेळी काही काळ पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एसपींची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे या बाहेर आल्या, आपल्या गाडीकडे जात असताना त्या बेशुद्ध पडल्या त्यामुळे त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची अठरा महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या प्रकरणातले आरोपी अद्याप मोकाट आहेत. पतीच्या मारेकर्यांना शिक्षा मिळावी, आपल्याला न्याय मिळावा यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात अनेकदा येऊन या प्रकरणी न्यायाची याचना करत आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याबाबतचा इशारा दिला होता. आज दुपारी बाराच्या सुमारास ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियांसमवेत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या गेटवर डेरेदाखल झाल्या, पोलिसांनी त्यांच्या गाडीला अडवले, त्यांना गाडीतून खाली घेत पोलीस अधिक्षकांची भेट घेण्याबाबत सांगण्यात आले, मात्र याच वेळी ‘आम्हाला न्याय द्या’ म्हणत ज्ञानेश्वरीम मुुंडे व कुटुंबियांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र सोबत आणलेल्या पेट्रोलच्या दोन बाटल्या पोलिसांनी योग्य वेळी आपल्या ताब्यात घेतल्या. या वेळी पोलीस आणि ज्ञानेश्वरी मुंडे याचंयात झटापट झाली. काही काळ पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे ज्ञानेश्वरी मुंडे या पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांना भेटल्या. बाहेर येऊन त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. आपला पोलिसांवर विश्वास असल्याचे सांगत पोलीस अधिक्षकांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. पुढे आपल्या गाडीकडे जात असताना त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.








