चार लाखांचा ऐवज लंपास
गेवराई (रिपोर्टर): अज्ञात चोरट्यांनी घराच्या किचनकडील दरवाज्याचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील कपाटामधील बॅगमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा तीन ते चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील गैबी नगर तांडा येथे शिक्षकाच्या घरी घडली. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, गैबीनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे अण्णासाहेब गोपीनाथ चव्हाण हे रात्री जेवण करून झोपले. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा गैरफायदा घेत त्यांनी चव्हाण याचंया घराच्या किचनच्या दरवाज्यातून घरात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये असलेली बॅग उघडून त्यामधून रोख रकमेसह दीड तोळ्याची सोन्याची पट्टी गंठण, सोन्याचे झुंबर, शॉर्ट गंठण, सोन्याची नथ, लॉकेट असे एकूण तीन ते चार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी अण्णासाहेब चव्हाण यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गु.र.नं. 257/2025 कलम 331 (4), 305 भा.न्यास.2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










