बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा वर्ग खोली बांधकाम करणे आणि शाळा दुरूस्त करणे यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत 14 कोटी रूपये आवश्यक असलेल्या निधीचा आराखडा पाठविण्यात आला आहे. त्यापैकी 381 शाळा पैकी 607 वर्ग खोल्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे तर 147 नवीन वर्ग खोल्या बांधकाम करणे गरजेचे आहे. त्यापैकी या वर्षाच्या नियोजन आराखड्यातून वर्ग खोल्या शाळा दुरूस्तीसाठी 5 कोटींचानिधी मिळण्याची शक्यता शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सांगितले.
यावर्षी जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून प्राधान्य क्रमाने शाळा दुरूस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा परिषदेला प्रशासनाने सांगितले होते. त्यामुळे नवीन शाळांना किती वर्ग खोल्या बांधकाम करणे गरजेचे आणि किती शाळांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे याचा सविस्तर आराखडा जि.प.च्या शिक्षण विभागाने तयार केला आहे. जिल्ह्यातील 381 ज्या शाळा आहेत त्यातील 607 वर्ग खोल्या या पुर्णपणे ना दुरूस्त झालेल्या आहेत. त्या दुरूस्त केल्या तर त्या ठिकाणी वर्ग भरविणे शक्य आहे. तर नव्याने 398 शाळांपैकी 147 शाळांना नवीन वर्ग खोली बांधणे गरजेचे आहे असे असतांना या वर्षी मात्र वर्ग खोली बांधकाम ऐवजी वर्ग खोलीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून निधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत तालुका वाईज हा सगळा अहवाल जिल्हा नियोजन विभागाला सादर करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 2471 शाळा आहेत.








