
धानोरा रोड ते अंकुशनगर रस्ता कधी होणार?
बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिका हद्दीत असलेल्या धानोरा रोड ते अंकुश नगर या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. एक वर्षापूर्वी या रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी आश्वासन देण्यात आले होते. आश्वासन देऊनही रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे आज सामाजीक कार्यकर्त्यांनी चिखलात लोटांगण आंदोलन करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला.
बीड शहरातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत. या खराब रस्त्यांचे काम नगरपालिकेकडून केले जात नाही. धानोरा रोड ते अंकुश नगर हा रस्ता नवीन करण्यात यावा, या मागणीसाठी सातत्याने निवेदन देण्यात आले. एक वर्षापूर्वी आंदोलन देखील करण्यात आले होते मात्र याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. आज बीड शहर बचाव मंचच्या वतीने रस्त्यावर लोटांगण आंदोलन करण्यात आले. सामाजीक कार्यकत्यांनी अक्षरश: चिखलात लोटांगण घेऊन नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला.








