
30 लाखांचा माल जळून खाक
अंबाजोगाई (रिपोर्टर): गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शॉपिंग मॉलला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने तब्बल 30 लाखांपेक्षा अधिक रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. सदरच्या दुकानामध्ये कुलर, कपाट यासह घर संसाराचे सामान विक्रीसाठी असायचे. लग्नकार्यात 1 लाख 10 हजार रुपयात 30 वस्तू याठिकाणी मिळायच्या त्यामुळे अंबाजोगाईसह परिसरामध्ये प्रगती शॉपिंग मॉल हे बहुचर्चीत झाले होते. रात्रीच्या दरम्यान आग लागली आणि बहुतांशी वस्तू या प्लॅस्टीक, लाकूड असल्याने आगीने उग्रस्वरुप धारण केले. आग विझवण्याचा प्रयत्न झाला मात्र दुकानातील सामान जळून खाक झाले.
अंबाजोगाई येथील फय्याज मोमीन यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंडीबाजार याठिकाणी प्रगती शॉपींग मॉल उघडले होते. या दुकानामध्ये घर संसार उपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या असायच्या. ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपयात 30 वस्तू याठिकाणी मिळायच्या. त्यामुळे विवाह समारंभासह अन्य खरेदीदार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायचे. त्या अनुषंगाने दुकानात सातत्याने मोठ्या प्रमाणावर कुलर, कपाट, फर्निचर यासह वेगवेगळ्या वस्तू असायच्या. काल संध्याकाळी दुकान मालक हे दुकान बंद करून गेले मात्र रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. सदरची आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा कयास काढला जात आहे. दुकानामध्ये लाकडी व प्लॅस्टीकच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही वेळात रौद्ररुप धारण केले आणि प्रगती शॉपींग मॉलला आपल्या विळख्यात घेतले. या आगीत 30 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा माल जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. आग विझवण्याचा प्रयत्न झाला परंतु आगीच्या रौद्ररुपासमोर आग विझवणारे हतबल झाल्याचे दिसून आले.









