जालना : ऑनलाईन रिपोर्टर
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून लाभ देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी (27 ऑगस्ट) अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा निघाला आहे. सकाळी 10 वाजता जरांगे यांनी आंदोलकांसह जालन्यातून प्रस्थान केले असून, पहिला मुक्काम जुन्नर येथे होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूरमार्गे 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदान, मुंबई येथे पोहोचणार होता.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. तरीदेखील जरांगे यांनी “मुंबईला जाण्याच्या निर्णयावर ठाम” असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या आंदोलनात आताच मराठ्यांचा जनसागर उसळला आहे
जालना पोलिसांची अटींसह परवानगी
मुंबई आंदोलनासाठी जालना पोलिसांनी मनोज जरांगेंना 40 अटींसह परवानगी दिली आहे. न्यायालयाचा आदेशाची प्रतही त्यांना देण्यात आली असून, कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा बिघाड होऊ नये यासाठी या अटी लादण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या अटी :
- आक्षेपार्ह घोषणा किंवा जातीय तेढ निर्माण करणारी विधाने केली जाणार नाहीत.
- जाहीर केलेला प्रवासमार्ग बदलला जाणार नाही.
- प्रवासादरम्यान अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेडसारख्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडथळा होणार नाही.
- खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आयोजक आणि आंदोलनकर्त्यांना करावी लागेल.
- सहभागी नागरिकांनी शस्त्र, लाठी, तलवार, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगू नयेत.
याशिवाय, ध्वनीप्रदूषण, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, सार्वजनिक सुरक्षितता यांचा विचार करून आणखी 40 अटी घालण्यात आल्या आहेत.








