बीड – ऑनलाईन रिपोर्टर
मुंबईसाठी रवाना झालेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. काल (27 ऑगस्ट) अंतरवली सराटीतून सुरू झालेला मराठा मोर्चा आज सकाळी शिवनेरीवर दाखल झाला. यानंतर मुंबईच्या दिशेने मोर्चा निघालेला असतानाच जुन्नर जवळ आंदोलनातील एक कार्यकर्ते सतीश देशमुख (रा. वरपगाव, ता. केज, जि. बीड) यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला.
या अचानक झालेल्या निधनामुळे मोर्चातील वातावरणात शोककळा पसरली आहे. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने संपूर्ण मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे. गावात तसेच जिल्हाभरात शोककळा पसरली असून मोर्चातील लाखो मराठे बांधव दुःख व्यक्त करत आहेत.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलनातच कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने या लढ्याची किंमत किती मोठी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.








