ऑनलाईन रिपोर्टर
शिवनेरी | 28 ऑगस्ट
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा निर्णायक टप्पा आता जवळ आला आहे. अंतरवली सराटीतून 27 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने समाजबांधवांसह मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाला. शिवनेरीच्या ऐतिहासिक पायथ्यावरून जरांगे यांनी सरकारवर थेट निशाणा साधत मराठा समाजाच्या ज्वलंत मागण्यांची पुनरुच्चार केला.
“समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळालाच पाहिजे”
शिवनेरीवर दाखल होताच पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले – “रायगड, शिवनेरी यांसारखी स्थळे आम्हाला प्रेरणा देतात. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. तुम्ही आमचे वैरी नाही, पण मराठाविरोधी भूमिका सोडा.”
त्यांनी पुढे सांगितले – “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही योग्य संधी आहे. त्यांनी जर मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी केली, तर हेच मराठे त्यांचे उपकार कधीही विसरणार नाहीत. शिवनेरीच्या पायथ्यापासून मी हा शब्द देतो.”
एक दिवसाच्या आंदोलन परवानगीवर नाराजी
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी दिलेल्या फक्त एक दिवसाच्या परवानगीवर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. एक दिवसाची परवानगी देऊन सरकार वेळकाढूपणा करत आहे. न्यायालयाने सांगितलं म्हणून आम्ही परवानगी घेतली, पण लोकशाहीत हा प्रकार योग्य नाही,” अशी टीका त्यांनी केली.
जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा–कुणबी एक आहेत – याची तातडीने अंमलबजावणी करावी.
- हैदराबाद व सातारा गॅझेटियर लागू करावेत – 13 महिन्यांचा अभ्यास न थांबवता निर्णय द्यावा.
- सगे–सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी – कुणबी नोंद सापडलेल्या कुटुंबांचे नातेवाईक पोटजातीमध्ये समाविष्ट करावेत.
- गुन्हे मागे घ्या – आंदोलनादरम्यान झालेल्या खटल्यांतून मराठा बांधवांना मुक्तता द्यावी.
- कायदेशीर, कायमस्वरूपी आरक्षण द्या – समाजाला फसवणूक न करता ठोस निर्णय घ्यावा.
मुंबईकडे निर्णायक मोर्चा
शिवनेरीवरून शक्तीप्रदर्शन केल्यानंतर जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की – “मुंबईला जाणारच. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय परत फिरणार नाही. आडमुठेपणा सोडा, अन्यथा लाखो मराठे शांततेत पण ठाम आंदोलन करतील.”









