
तोडग्यासाठी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू
पवार-शिंदे बैठकीला, अन्य मंत्री उपस्थित, तोडगा काय निघतो याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष
मराठा आंदोलनाच्या याचिकेवर आजच सुनावणी
अंतरवलीत ओबीसीच्या उपोषणाला परवानगी नाकारली, बंदोबस्त वाढवला,

मुंबई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून अन्नाबरोबर आज मनोज जरांगे पाटलांनी पाणीही पिणार नसल्याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाची तीव्रता अधिक होत आहे. आज आठवड्यातला पहिला दिवस असल्याने मुंबईकरही बाहेर पडले आहेत. त्यामुळे आंदोलकांसह आता मुंबईकरांनाही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकार अलर्ट मोडवर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. दुसरीकडे अनेक ठिकाणच्या वाहतुकीत बदल केला असून मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे तर तिकडे अंतरवली सराटी येथे ओबीसी नेते उपोषणाचा हट्ट धरत असून पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली असून अंतरवली सराटीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
विटी दांडू, कुस्ती, कबड्डी, खो-खो, चीरघोडी, सुरफाटीचे खेळ
थेट मुंबईच्या रस्त्या-स्त्यावर

मुंबई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. सुरुवातीचे दोन दिवस आंदोलकांसाठी अत्यंत आव्हानात्मक गेल्यानंतर आता अन्नपाण्याची रसद राज्यभरातून मुंबई महानगरीत येत आहे. त्यामुळे आंदोलनासाठी निर्दाहस्त झालेले मराठा आंदोलक सीएसटी, ताज, गेटवे ऑफ इंडिया सहमुंबईच्या रस्त्या रस्त्यावर विटीदांडू, कुस्ती, कबड्डी, खो-खो, चिरघोडी, सुरफाटी, गरभाचे खेळ खेळताना दिसून येत आहेत. शेवटी या खेळातही ‘लढेंगे जितेंगे हम सब जरांगे’ ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणा देत असल्याचे दिसून येते. मुंबईच्या सीएसटी स्थानकासमोर आज मराठा आंदोलकांनी वेगवेगळे खेळ खेळून मुंबईकरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी थेट कुस्त्यांची लढत पहावयास मिळाली. एक कुस्तीतर दोन वृद्ध मराठ्यांची सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. विटी दांडू, कबड्डी, खो-खो, चिरघोडी, सुरफाटी हे ग्रामीण भागातले पारंपारिक खेळ मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर आंदोलक खेळताना दिसून येत आहेत.






मुंबई बाहेर पोलिसांकडून गाड्यांची अडवणूक
राज्य सरकारने आडमुठी भूमिका घेत आंदोलनाच्या पहिल्या आणि दुसर्या दिवशी आंदोलकांना अन्नपाणी मिळणार नाही याचा प्रयत्न केला. कालपासून राज्यभरातून आंदोलकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था उभ्या महाराष्ट्रातून होऊ लागली. आज मात्र मुंबईबाहेर सरकारने जी पोलीस यंत्रणा उभी केली आहे ती पोलीस मराठा आंदोलकांच्या गाड्या आडवत आहे. अन्नधान्यासह जेवणाच्या गाड्या अडवून आंदोलकांसोबत हुज्जत घालत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल दिसून येत आहेत.
मराठा आरक्षण: मुख्यमंत्री फडणवीसांच्या
वर्षा निवासस्थानी बैठक
उपमुख्यमंत्री शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर बैठकांचा जोर दिसून आला. मात्र, सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. ’बैठकांना जोर, चर्चेला मात्र ब्रेक’ असे चित्र होते. दुसरीकडे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत आपण सोमवारपासून पाणीही पिणार नाही, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. यातच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. सीएसएमटी स्थानक परिसर, मंत्रालयासह अनेक भागांत मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यामुळे गर्दीत भर पडत असून, अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री, नेते या बैठकीत उपस्थित आहेत. तत्पूर्वी, मंत्रिमंडळ उपसमितीची अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला सदस्य मंत्र्यांची उपस्थिती होती. अॅडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ यांच्याशी दीड तास चर्चा केली. दिवसभराच्या घटनाक्रमाची माहिती विखे पाटील यांनी फोनवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. जरांगे पाटील यांनी मराठा अभ्यासकांसमवेत आझाद मैदानावरील उपोषणस्थळी दीड तास चर्चा केली. जरांगे पाटील यांची उपोषणाच्या तिसर्या दिवशी तब्येत खालावल्याने डॉ. कोरडेंनी त्यांची तपासणी केली. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन घ्या, असे कोणी म्हणत असेल आणि त्यावर सरकारने केवळ अशांना खूश करण्यासाठी निर्णय घेतलाही तरी तो एक दिवसही टिकणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांचाही विचार करावा लागेल. कोणाला खूश करायचे म्हणून सरकारने निर्णय घेतला अन् तो टिकला नाही तर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल. म्हणून आम्ही चर्चा करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
गोंधळ घालणार्यांना सरकारने पाठवले होते का?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून जरांगे यांनी आमरण उपोषण केले. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत, या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. आज ’राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत गोंधळ केला. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झालेल्या गोंधळावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं. सरकार दंगल घडवू शकतं. कारण माझी पोरं असं काही करत नाहीत. गोंधळ घालणारे सरकारचेच लोक असू शकतात. त्यामुळे ते असे वागले. सर्वांनी सावध राहा. इथं येणार्या कुठल्याही नेत्याला त्रास देऊ नका, बाकी मी सगळे बघतो, असंही जरांगे पाटील म्हणाले.
यापुढे सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे
पोरांनो नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घातला तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. इथे कोणीही येऊ द्या, भाजपाचा नेता किंवा आणखी कुठल्या पक्षाचा नेता, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा किंवा इतर पक्षाचा नेता इथे आल्यावर त्याला सन्मानाने वागवा. आपल्याला सहन होतंय तोवर त्यांचा सन्मान करायचा. परंतु, जेव्हा आपल्याला वाटेल की आरक्षण मिळत नाही तेव्हा बघू काय करायचं. परंतु, सध्या कुठल्याही पक्षाचा नेता इथे आला तरी उलट बोलू नका. आता यापुढे सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदानावरील आंदोलनाला भेट दिली. यावेळी आंदोलकांनी सुळे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे कारकडे जात होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली.यावेळी आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवले.






