
परळीच्या डाबीत रात्रीची घटना, पती फरार
परळी, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात दिवसेदिवस गुन्हेगारी घटनांना अंजाम देणार्या नतदृष्ट पैदाशिंचा नंगानाच एकीकडेच सुरूच असतांना दुसरीकडे संसारीक वादातून खून, आत्महत्या सारख्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. रात्री घराच्याबाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या पत्नीच्या पोटात थेट भाला सदृष्य हत्याराने वार करून तिची हत्या केली आणि पती घटनास्थळावरून फरार झाला.
ही खळबळजनक खुनाची घटना परळी तालुक्यातील डाबी गावातील एका शेतात घडल्याने या भागात प्रचंड खळबळ उडाली आहे. या खळबळजनक घटनेची अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील डाबी येथील तुकाराम मुंडे हा आपल्या कुटूंबासमवेत शेतात राहत होता. रात्री त्यांच्या कुटूंबियंाचे जेवण झाले. त्यानंतर दोन मुलांना तुकाराम मुंडे याने घरामध्ये झोपवले तर स्वतः आणि त्याची बायको शोभा मुंडे हे दोघे घराच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले. आज सकाळी त्यांच्या मुलांनी दार उघडले तेव्हा त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली. तेव्हा अन्य लोक घटनास्थळी जमा झाले.
त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. परळी ग्रामीण पोलीस घटनेची गांभीर्य पाहून घटनास्थळावर गेले तेव्हा महिलेच्या पोटात भाल्यासारख्या शस्त्राने पोटात वार केल्याचे आणि मारहाण केल्याचे दिसून आले. ज्या हत्याराने शोभा मुंडे यांना मारण्यात आले ते त्या ठिकाणीच होते. त्या दोघांमध्ये नेमके रात्री काय झाले. तुकाराम ने शोभा हिची हत्या का केली ? हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात असून पोलिसांनी मृतदेहा ताब्यात घेत परळी रूग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला आहे. तर हत्या केल्यानंतर तुकाराम मुंडे मोटारसायकल घेवून अज्ञान स्थळी फरार झाल्याचे संागण्यात येते. सदरच्या खुनाच्या घटनेने परळी तालुक्यात खळबळ उडाली आहे.









