
विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
नेकनूर(रिपोर्टर): नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालयात उर्दू विषयासाठी सध्या एकही शिक्षक उपलब्ध नाही. त्यामुळे उर्दू माध्यमातून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
या संस्थेत दरवर्षी उर्दू माध्यमातील अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात, मात्र शिक्षकच नसल्यामुळे उर्दू विषयाचे अध्यापन थांबले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःहून अभ्यास करावा लागत असून, योग्य मार्गदर्शन व संकल्पनांचे स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. वर्गात शिकवायला कोणीच नाही. काही वेळा इतर विषयांचे शिक्षक मदत करतात, पण ते पुरेसे नाही, असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालकांमध्येही नाराजी पसरली आहे. सरकारी संस्थांमध्येच जर शिक्षकांची कमतरता असेल, तर आम्ही आमच्या मुलांना काय शिकवायचं? असा सवाल एका पालकाने उपस्थित केला.
या प्रकरणी शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी शिक्षकांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे सांगितले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही स्थिती कायम आहे, हे लक्षात घेता प्रशासनाच्या आश्वासनांवर शंका व्यक्त केली जात आहे.
उर्दू शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले असून, संबंधित विभागाने तातडीने योग्य तो शिक्षक नेमावा, ही मागणी विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वत्र होत आहे.







