
‘सत्य आम्हा म्हणी नव्हे गभाळ्याचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावी असे बरे’, होय आम्ही आज सुरुवातीलाच हा अभंग घेतोय. कारण आमच्या आनंदाला नव्हे नव्हे अवघ्या बीडकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचे कारणही तेवढेच महत्वाचे. गेली पन्नास वर्षे आमच्या आजाने जे स्वप्न पाहितलं, ते आमच्या लेकराने रेल्वेत बसून पुर्णत्वास नेलं. हे तेव्हाच झालं जेव्हा काम करणार्या माणसाने आमच्या बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. रेल्वेचा लढा आणि त्यासाठी केलेला संघर्ष हा कुणा एकट्या दुकट्याचा नव्हता, हे जेवढे आम्ही छातीठोक सांगू तेवढेच या लढयाच्या अनुषंगाने आगीन गाडीला एकदम ट्रॅकवर आणणारे नेतृत्व आमच्याकडे नव्हतच असंही नाही, परंतु विघ्न आणि संघर्ष आमच्या बीडच्या पाचवीला पुजलेला होता, ते विघ्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जेव्हा बीडचे पालकमंत्री झाले तेव्हा ते दूर झाले. या लढ्याचा इतिहास आम्हाला सांगायचा नाही, या लढ्यासाठी कोणी कोणी संघर्ष केला, त्यात लोकप्रतिनिधी कोण होते, नेते कोण होते, सामाजीक कार्यकर्ते कोण होते, सर्वसामान्य किती होते हे सर्वांना माहितीय. परंतु गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडात रेल्वेच्या कामाला जी गती आली ती गेल्या पन्नास वर्षात कधीच आली नव्हती. कर्तव्य-कर्माला महत्व देत पहाटे सहाला ज्या नेत्याचे काम सुरू होते आणि रात्रीच्या बाराला ज्या नेत्याचे काम बंद होते म्हणजे तब्बल 18 तास जो नेता फिल्डवर काम करतो तोच बाजीगर होतो हे अजितदादांनी बीडच्या रेल्वेबाबत दाखवून दिले. आजपर्यंत ते बीडमध्ये 5 ते 6 वेळेस आले, सर्वसामान्यांसह अधिकार्यांना त्यांनी खडेबोल सुनावले. म्हणूनच आम्ही जगद्गुरू तुकोबांचा अभंग अजितदादांना शब्दांच्या रत्नाचा हार घालताना घेतला.
रेल्वेचे श्रेय
कोणी घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोणी किती बॅनर लावायचे हाही ज्याचा त्याचा प्रश्न. या रेल्वेसाठी बीडच्या अबालवृद्धांनी जो लढा दिला त्यातल्या एकाचेही बॅनर नसले तरी योगदान ठासून आहे. यात दुमत असण्याचं कारण नाही. काल जेव्हा बीडपासून अहिल्यानगरपर्यंत रेल्वे धावली तेव्हा सोशल मिडिया, बॅनरबाजी यापेक्षा सर्वसामान्य बीडकरांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ‘अजितदादा कायम आपले पालकमंत्री पाहिजेत’, इथली शासन-प्रशासन व्यवस्था सुतासारखी सरळ आणि व्यवस्थीत चालते. दादा खडेबोल सुनावतात खरे पण त्यात सत्यता असते, न्याय असतो. या ज्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया अजितदादांच्या बाबत आल्या त्या अंत:करणातून होत्या. होय, पन्नास वर्षांमध्ये रेल्वेचे काम जे कासवगतीने चालू होते ते काम चित्त्यासारखे अचानक धावले ते केवळ आणि केवळ अजितदादा पावले म्हणूनच. हे आम्ही ठणकावून सांगायला मागेपुढे पाहणार नाहीत. गेल्या तीन-चार महिन्यांच्या कालखंडात बीडच्या रेल्वेबाबत असं काय घडलं, की रेल्वे मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या उपस्थितीत अहिल्यानगरच्या दिशेने धावली. ते एवढचं
अजितदादांसारखा निब्बर
आणि खमक्या पालकमंत्री
बीड जिल्ह्याच्या नशिबी आला. जेव्हा अजितदादांनी बीडचे पालकत्व स्विकारले तेव्हाच त्यांनी बीड जिल्ह्याचा जटील असा रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचे निश्चित केले. आता अनेकांना असे वाटेल, या आधी काय पालकमंत्री नव्हते काय? मंत्री नव्हते काय? किंवा लोकप्रतिनिधी नव्हते काय? होय, आम्ही अगदी स्पष्ट म्हणू होते. परंतु त्यांना केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादीत ठेवले होते. मग तो कुणच्याही पक्ष असो. त्यांना भरारी घेण्याची मुभा नव्हती अथवा इथे सर्वच नेते स्वत:ला सर्वांगीन पहात असतील? परंतु इथं अजितदादा पालकमंत्री झाले, त्यांनी बीडचा पहिला दौरा केला आणि पहाटे सहापासून जसेच कामाला लागले तसे बीडकरांना गेल्या पन्नास वेर्शत जे पहायला भेटले नाही ते दृष्टीक्षेपास आले, ते म्हणजे पालकमंत्री सहा वाजता कामावर निघतात. अवाक् होऊन जो तो अजितदादांच्या काम करणार्या पद्धतीवर सकारात्मक चर्चा करत होता. मग स्वच्छतेपासून ते बीडच्या विकासाभिमुख समृद्धीपर्यंत अजितदादा बोलू लागले नव्हे तर त्यावर काम करू लागले. अहो काल आम्ही बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अजितदादा जेव्हा गेले तेव्हा त्यांनी दरवाज्याला ठोकलेल्या खिळ्यांमध्ये फरक असल्याचे उपस्थितांना सागूंन एक उपमुख्यमंत्री कुठपर्यंत लक्ष देतो हे जेव्हा दाखवून दिलं का तेव्हाच बीडकरांना कामाचा माणूस म्हणून स्वत:चा ऊर भरून आणला. बीड-अहिल्यानगर रेल्वे धावावी यासाठी अजितदादांनी गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडात एक रणनीती आखली आणि या कामावर

अजितदादांचे दोन शिलेदार
दादांनीच नियुक्त केले. त्यामध्ये दादांचे खासगी सचीव डॉ. प्रशांत भांबरे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त तथा उपमुख्यमंत्र्यांचे सचीव डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे बीडच्या रेल्वेची जबाबदारी देण्यात आली. सर्वप्रथम अजितदादांनी रेल्वेबाबत एक महत्वाची बैठक सर्वांसोबत घेतली. रेल्वे धावणे म्हणजे बटन दाबलं अन् निघाली असं होत नाही. रेल्वे रुळ म्हटलं की, महामार्ग असेल, रस्ते असतील, वीज असेल, जमीन अधिग्रहण असेल यासह वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदार्या आणि त्यांचे नियम-अटी जेव्हा पूर्ण होतात तेव्हा एखादं काम पूर्णत्वास जातं. बीडची रेल्वे न धावण्यामागे हेही कारण होतं. वेगवेगळ्या खात्यातील अधिकार्यांचं एकमत अथवा बीड रेल्वेप्रश्न सोडवण्याबाबत तात्काळ निर्णय यांच्याकडून घेतलेच जात नव्हते. म्हणूनच अजितदादांनी बीड रेल्वेचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी डॉ. भांबरे, डॉ. देशमुख यांच्यावर सोपवली. गेल्या तीन महिन्यांत राजेश देशमुख हे प्रत्येक तीन-चार दिवसाला या सर्व खात्यांच्या अधिकार्यांसोबत बैठक घ्यायचे, त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचे आणि त्या तात्काळ सोडवण्याबाबत मार्गदर्शन करायचे. अधिकारी कधी त्या खात्याने हे केलं, कधी या खात्याने ते केलं, असं म्हणत रेल्वेप्रश्न जटील करून ठेवायचे, परंतु डॉ. प्रशांत भांबरे आणि डॉ. राजेश देशमुख यांनी चालू दीह महिन्यात रेल्वेच्या सर्व अडचणी दूर केल्या अन् त्यामुळेच बीडची रेल्वे काल अहिल्यानगरला गेली. बीडकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काल असंख्य जणांनी तिते जावून सेल्फी काढल्या, फोटो काढले, काहीजण रेल्वे स्थानकापासून रेल्वेत बसून राजुरीपर्यंत गेले आणि टमटममध्ये परत बीडमध्ये आले.


हे सर्व श्रेय अजितदादांनाच
हो, थांबा! श्रेय घेणार्यांनो पोटात गोळा आणू नका, हे आमचं तर मत आहेच, उभ्या जिल्ह्याचंही आणि तेथील सर्वसामान्य माणसांचंही हे मत आहे. माणूस तसा राकट अन् बिनतोड असायलाही हवं. दादा भाषणात काल बोलले, नुसतं चेकाळू नका, आपल्याला काम करायचय. बीड जिल्ह्याचा विकास न भूतो ना भविष्यती करायचाय, जरा सुधरा, असंही दादा म्हणाले. आम्ही दादांच्या मतांशी सहमत आहोत. आम्हा बीडकरांना आणि जिल्हावासियांना सुधरावं लागल, सकारात्मक दृष्टीकोन ठेवावं लागेल, तेव्हा असे मोठमोठे विकासाचे कामे मार्गी लागतील. अजितदादांनी रेल्वेचा प्रश्न संपुष्टात आणला. तसा अन्य बीडचे अनेक प्रश्नही मार्गी लागतील. अजितदादांमुळेच बीडला आत्ता रेल्वे आली. हे कोणलाही नाकारता येणार नाही. अहो, एका झटक्यात दीडशे कोटी अजितदादांनी वितरीत करून टाकले. गेल्या चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ती, म्हणूनच अजित दादा अखंड बीडकर आणि जिल्हासियांकडून तुमचे जाहीर आभार!!
बीड जिल्हा तसा राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील. इथे गेल्या पन्नास वर्षांपासून रेल्वेचा रहाटगाडा सुरु होता, तो काही पुर्णत्वाकडे जात नव्हता. मात्र अजितदादांनी आमचं पालकत्व स्विकारलं तेव्हाच हा जटील प्रश्न सुटणार हा विश्वास आमच्यातच नव्हे तर जिल्हावासियांत निर्माण झाला. त्याचं कारणही तसं तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे हे याप्रश्नी वेळोवेळी अजितदादांकडे पाठपुरावा करत राहिले होते आणि आत्ताही रेल्वेच्या प्रश्नाचे बीडकरांबाबत किती महत्व हे मुंडे अजितदादांना सांगत होते. अजितदादांनाही याप्रश्नाबाबत चांगलीच माहिती होती आणि त्यांनी मनोमनी ठरवले, म्हणूनच आज बीडकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि जो तो आनंदाची डोहे आनंद तरंग म्हणत अजितदादांना धन्यवाद देतोय.
-शेख तय्यब
संपादक
सायं. दैनिक बीड रिपोर्टर








