
पाच जणांना अटक, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
केज (रिपोर्टर): केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बनसारोळा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. महेंद्र गायकवाड यांच्या शेतात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ’तीर्रट’ नावाचा जुगार खेळताना सात जणांना पाहिले. पोलिसांना पाहताच त्यापैकी दोघांनी पळ काढला, मात्र विष्णु शंकर दळवी, बालाजी भारत कावळे, अतिनंद रामा कांबळे, गणेश दिगंबर फसके आणि महादेव भागवत राऊत यांना पोलिसांनी अटक केली.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून रोख 5 हजार 200 रुपये, जुगार साहित्य तसेच 5 मोटारसायकली असा एकूण 2 लाख 48 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस हवालदार धनंजय कारले यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कडक कारवाईचे स्वागत होत आहे.






