
गोदापात्रातील छाप्यात एका ट्रॅक्टरवर कारवाई ; तर आर्थिक तडजोड करून लोडर गायब
गेवराई (रिपोर्टर): गेवराईचा वाळू उपसा पाच दिवसांपूर्वी सायं. दैनिक बीड रिपोर्टरने महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर तीन ते चार दिवस अवैध वाळू उपसा पूर्णत: थांबला. मात्र नंतर पुन्हा वाळू माफियांनी डोके वर काढत वाळू उपसा सुरु केला. पोलिसांनी एका ठिकाणी छापा मारला. ट्रॅक्टर व लोडर पकडलेही परंतु तडजोड करून ते सोडले. याची माहिती जागरुक नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिली. पोलीस अधिक्षकांनी ठाणे प्रमुखाला झापझाप झापले असता सोडून दिलेले ट्रॅक्टर पुन्हा ताब्यात घेतले. मात्र लोडर आर्थिक तडजोडून सोडून दिले. यातून गेवराई पोलीस वाळू माफियांसाठी काम करत असल्याचा आरोप थेट जनतेतून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सपोनि दिपक लंके यांनी गोदापात्रात छापा मारला. वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर तसेच वाळू भरण्यासाठी वापरण्यात येणारे लोडर या दोन्ही वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, कारवाई फक्त एका ट्रॅक्टरपुरतीच मर्यादित राहिली. यामुळे दुसर्या वाहनाला कोणी वाचवलं? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यानंतर आर्थिक तडजोडीच्या माध्यमातून लोडर वाहन सोडण्यात आले, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. एवढेच नव्हे तर, या तडजोडीची माहिती गुप्त बातमीदाराने थेट बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांना दिल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा हलली.
पोलिस अधीक्षकांनी सूत्र हलवल्यानंतर गेवराई पोलिसांनी धावपळ करत, गेवराई शहरा बाहेरील डिसेंट हॉटेलवरून तातडीने एक ट्रॅक्टर बोलावून घेत त्यावर औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, लोडर गायबच झाला असून यामुळे पोलिसांच्या या कारवाईत संशयाचा धूर निघत असल्याचे उघडपणे दिसुन येत आहे. एक वाहनावर दिखाऊ कारवाई आणि दुसर्याला मोकळा रस्ता हीच का पोलिसांची पारदर्शकता? असा संतप्त सवाल नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. तालुक्यातील वाळू माफियांशी संगनमत करून काही अधिकारी लाखोंची तडजोड करून गप्प बसतात, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. परिणामी, सामान्य जनतेच्या डोळ्यासमोर कायद्याची पायमल्ली होत असूनही पोलीस प्रशासन ‘अंध’ बनल्याचं चित्र दिसतंय.या पार्श्वभूमीवर आता पोलिस अधीक्षक नवनित कॉवत हे संबंधित अधिकार्यावर ठोस कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा, या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा धुळीत मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धुमेगाव येथील गंज्याच्या शेतीत स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई ; चकलांबा पोलीस मात्र वाळूच्या हप्तेवसुलीत दंग
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर धुमेगाव शिवरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका गांजाच्या शेतीत जाऊन कारवाई केली. मात्र एवढ्या जवळ ही गांज्याची शेती पिकत असताना चकलांबा पोलिसांना याचा थांग पत्ता नाही हे दुर्दैवच!
दरम्यान चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात मोठा गोदापट्टा येत असून येथील पोलीस रात्रंदिवस फक्त वाळू पट्यात जाऊन हप्ते वसुली दंग असल्याचे दिसत आहेत. त्यांना वाळूच्या हप्ते वसुली व्यतिरिक्त ईतर कारवायाचं काहीच घेणं देणं नसल्याचे या करवाईतून दिसून येत असून याबाबत पोलीस अधीक्षक काय ऍक्शन घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






