
एक गंभीर जखमी; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ पहाटेची दुर्घटना
पुणे (रिपोर्टर): शहरात रविवारी (ता. 2) पहाटे पाचच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळ भरधाव कारने मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या खांबाला जोरदार धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. मृतांची नावे यश भंडारे (वय 25, रा. पिंपरी) आणि ऋतिक भंडारे (वय 25, रा. पिंपरी) अशी असून, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेला खुशवंत तेजवानी (वय 25, मूळ रा. बीड) सध्या ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पोलो कार ही वेगात पिंपरीच्या दिशेने जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट मेट्रो प्रकल्पाच्या खांबाला जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला.
पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहे






