
गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातून गोदावरी नदी वाहत असल्याने पात्रा नजीकच्या अठरा ते बावीस गावांलगत नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे बीड रिपोर्टरने समोर आणल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनातील लाचखोर अधिकारी-कर्मचार्यांनी तूर्तसा वाळू माफियांना वाळू बंद ठेवण्याचे सांगितल्याबाबतचे वृत्त आहे. अशात पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात असून गेवराई पोलिसांनी काल साडेपाच वाजण्याच्या सुमारास म्हाळसपिंपळगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात एक ट्रॅक्टर जप्त केले. त्यामध्ये सहा हजार रुपयांची वाळूही पोलिसांनी ताब्यात घेतली.
वाळू उपश्याविरोधात आक्रमकपणे सर्वसामान्य लोक ओरड करू लागल्यानंतर या भागातला वाळू उपसा काही प्रमाणात बंद झाला. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास म्हाळसपिंपळगाव शिवारात अनिल सुनिल उदे हा स्वत:च्या फायद्यासाठी विनापरवाना, बेकायदेशीरपणे गोदावरील पात्रातून ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळू विक्री करण्याकरिता चोरून घेऊन जात असताना मिळून आला. त्यावेळी त्याच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचे एक स्वराज्य कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 23 बी.एच. 5571) असा असून पिवळ्या रंगाची ट्रॉली ताब्यात घेतली व केवळ सहा हजार रुपयांची वाळू जप्त केली. ही कारवाई गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी केली. दोन दिवसांपूर्वी लंके यांच्या कारनाम्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक नाराज होते. असे सांगण्यात येते. या कारवाया थातूरमातूर केल्या जात असल्याचेही या भागातील जनतेचे म्हणणे आहे.






