अजितदादांची राष्ट्रवादी फुल्ल फार्मात; भाजप 30 वर्षात प्रथमच चर्चेत
संदीप क्षीरसागरांचा उमेदवार गुलदस्त्यात, शेख मुजीब कोणाकडून येणार?
बीड (रिपोर्टर): उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 36 तास उरलेले असताना बीड नगरपालिकेसाठी अद्याप कुठल्याच पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. बीड शहरात निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय उलथापालथी होत असून काल अजितदादांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले योगेश क्षीरसागर आज निर्णायक मोडवर येण्यासाठी संभाजीनगरला जात तिथे त्यांनी मुख्यमंत्री व पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दुसरीकडे पंडितांच्या हाती बीडचे सूत्र आल्याने शिवछत्रात रात्रीपासून जागता जागर सुरु असून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पप्पू कागदे की आणखी कोण? यावर खलबते सुरु आहेत. इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा उमेदवार देण्याबाबत खल सुरू असून विष्णू वाघमारे की आणखी कोण? यावर चर्चा होताना दिसून येत आहे. दुसरीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे शेख मुजीब हे कोणाचे उमेदवार असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. योगेश क्षीरसागरांच्या माध्यमातून प्रथमच या निवडणुकीत भाजपा आता चर्चेत आली आहे.
बीड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होताना दिसून येत आहे. अजितदादा गटाचं आधिराज्य असलेल्या बीडमध्ये रात्री डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्ष आपल्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगत राष्ट्रवादीतून बाहेर पडणे पसंत केले. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याचे सांगितले. तसे पत्रकार परिषदेनंतर योगेश क्षीरसागर हे थेट संभाजीनगरला गेले तिथे त्यांनी पंकजांची भेट घेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. अचानक राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर योगेश क्षीरसागरांनी भाजपाकडून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार 35 उमेदवारांचे अर्ज भरून पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येते. दुसरीकडे अद्याप बीडमध्ये अध्यक्षपदाच्या एकाही उमेदवाराची घोषणा कुठल्याच पक्षाने केलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे 36 तास उरलेले आहेत.
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांचे नाव समोर येत असून अन्य दोघांबाबत अजितदादांची राष्ट्रवादी चाचपणी करत आहे. संध्याकाळपर्यंत त्यांचा अधिकृत उमेदवार घोषीत होण्याची शक्यता आहे. तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही अद्याप अध्यक्षपदाचा उमेदवार घोषीत केलेला नाही. त्यांच्याकडे विष्णू वाघमारेंसह अन्य दोन पर्यायी नावे असल्याचे सांगितले जाते. बीडमध्ये सध्याची स्थिती पाहता शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि एमआयएम अशी चौरंगी लढतीची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत आणखी काही जण या पक्षातून त्या पक्षात जाण्याची दाट शक्यता आहे.










