माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव नगरपालिका निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. मात्र या निवडणुकीत शहराच्या विकासाच्या मूलभूत मुद्द्यांवर चर्चा न होता जातीपातीच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
पालिका निवडणूक पंचरंगी होत असून पाचही प्रमुख पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. परंतु रस्ते, पाणी, स्वच्छता, मूलभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांना या निवडणुकीत हवा तसा भर न मिळता जातीच्या आधारावर मतसंघटना तयार करण्याचे राजकारण प्रकर्षाने दिसत आहे.
मागील सत्ताधार्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दा नागरिकांत पुन्हा चर्चेत आहे. तरीही या पालीका निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला पडून जातीपातीचे समीकरणच सर्वाधिक निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
या सर्व घडामोडींमुळे निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.











