बीड : पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाडसी कारवाई करत एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ३ लाख २३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. मनोज जोगदंड, पोह. रविंद्र झुनगरे, पोअ. युवराज पवार, संतोष कोटुळे, प्रभाकर जाधव यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे तळेगाव शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपासमोर मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळताना ५ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व ३ मोटारसायकलींसह १ लाख ५५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नं. ३६/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी कान्होबाच्या टेकडीजवळ, पालवन शिवारात सुरू असलेल्या ‘झन्ना–मन्ना’ जुगार अड्ड्यावर दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व ४ मोटारसायकलींसह १ लाख ६७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नं. ३९/२०२६ अन्वये कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत चोरीछुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे







