छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे त्यांचा लातूर दौरा तात्पुरता रखडला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक अडचण जाणवली. सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाण रद्द करण्यात आले असून परिणामी त्यांच्या प्रवासाच्या तसेच सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
हेलिकॉप्टरमध्ये आढळलेल्या बिघाडानंतर पंकजा मुंडे या दुसर्या हेलिकॉप्टरने लातूर व पुढील दौर्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज (3 फेब्रुवारी) जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंकजा मुंडे या लातूरसह सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथे सायंकाळी 6 वाजता तर कुंभारी येथे रात्री 8 वाजता त्यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे काल (2 फेब्रुवारी) पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर दौर्यावर होत्या. यावेळी वाळूज परिसरात झालेल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी हेलिकॉप्टरने प्रवास करते, त्यामुळे माझी आई देव पाण्यात ठेवते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अवघ्या दुसर्याच दिवशी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यात नुकताच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सध्या दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध होताच पंकजा मुंडे आपला निर्धारित दौरा सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.







