बीड (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय 30) यांच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासांत यश आले आहे. या खळबळजनक हत्येमागे कोणीतरी बाहेरील नव्हे, तर चांदचा जिवलग मित्र अतिक तांबोळी असल्याचे उघड झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपी अतिकला मध्यरात्री बीड शहरातून अटक केली आहे.
लग्नाच्या आदल्या रात्री रक्तरंजित कट
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत चांद याने आरोपी अतिककडे दीड लाख रुपये दिले होते. हे पैसे परत मिळावेत यासाठी चांद सतत तगादा लावत होता. विशेष म्हणजे, आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होते. पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन, असा इशारा चांदने दिल्याने अतिक प्रचंड चिडला होता. लग्नाच्या दिवशी बदनामी होईल, नातेवाईकांसमोर अपमान होईल या भीतीने अतिकने थेट टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
रविवारी रात्री अतिकने चांदला डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात बोलावून घेतले. दोघांमध्ये पुन्हा पैशावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि अतिकने जवळच असलेल्या दगडाने चांदच्या डोक्यावर सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
सोमवारी सकाळी उघडकीस आली घटना
सोमवारी सकाळी शेतकर्यांना शिवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता मृतदेहाची ओळख चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी अशी पटली.
स्थानिक गुन्हे शाखेची वेगवान कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयाची सुई मृताच्या मित्र अतिक तांबोळीवर स्थिरावताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि मध्यरात्री बीड शहरातून त्याला अटक केली.
शेवटचा फोन ठरला अखेरचा संवाद
चांद रविवारी बीडला आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने आपल्या पुतण्याला फोन करून, गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल, असे सांगितले होते. दुर्दैवाने, हीच त्याची शेवटची विचारपूस ठरली.
मित्राच्या हातूनच मित्राचा घात
ज्या मित्राच्या लग्नासाठी चांद उत्साहाने तयारी करत होता, त्याच मित्राने दीड लाख रुपयांच्या वादातून त्याचा काटा काढल्याची बाब समोर आल्याने रायमोह परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पैसे आणि प्रतिष्ठेच्या भीतीपोटी माणुसकी हरवली, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








