मुंबई : ऑनलाईन रिपोर्टर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर तब्बल 13 दिवसांनी त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक आरोप केले आहेत. हा अपघात नसून “शंभर टक्के घातपात” असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजितदादा मूळतः बारामतीला कारने जाणार होते. मात्र ऐनवेळी एका नेत्याच्या सांगण्यावरून फाईलवर सही करण्यासाठी ते थांबले. त्यानंतर पक्षातील एका नेत्याच्या उशिरामुळे आणखी विलंब झाला आणि अखेर वेळ वाचवण्यासाठी दादांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. हा प्लॅन कुणी बदलवला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवारांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत अजितदादा फार काळजी घेत होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणेही बंद केले होते. तसेच विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास करताना नेहमी खात्रीच्या व्यक्तीचेच वाहन वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.
अपघातग्रस्त विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला की, विमान अत्यंत कमी उंचीवर उडत असताना EGPWS इशारा आला होता का? जर आला असेल तर अलर्टचा आवाज का ऐकू आला नाही?
त्याचबरोबर व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या मेंटेनन्सवरही त्यांनी संशय व्यक्त केला. कंपनीला हेव्ही बेस मेंटेनन्स करण्याची परवानगी होती का? क्लिअरन्स इंजिनिअर, क्वालिटी इंजिनिअर आणि मेंटेनन्स इंजिनिअर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवारांनी उपस्थित केलेले 10 प्रश्न
अजितदादांचा बारामतीचा प्रवास प्लॅन कुणाच्या हस्तक्षेपामुळे बदलला?
विमानाचा पायलट आणि को-पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले?
दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? इंधन वाचवण्याचे आदेश होते का?
विमान एका बाजूला झुकण्यामागे मेकॅनिकल फेल्युअर कारणीभूत होते का?
टेक ऑफपूर्वी विमानाची तपासणी झाली होती का? टेकलॉग आणि एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहेत?
रूटिन मेंटेनन्स कुणी केलं? हँगरचे CCTV फुटेज कुठे आहे?
विमानाचा हेव्ही मेंटेनन्स कधी झाला? त्याचा अहवाल कुठे आहे?
युरोपमध्ये बंदी असलेल्या या विमानावर भारतात कारवाई का नाही?
दोन वर्षांपूर्वीच्या अपघाताचा रिपोर्ट अजून का आलेला नाही? तो दाबण्यात आला का?
मद्यप्राशन प्रकरणात बंदी आलेल्या पायलटला VIP विमानाची जबाबदारी का देण्यात आली?
या सर्व प्रश्नांची उच्चस्तरीय, स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी रोहित पवार यांनी केली असून, “सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.









