ऊसतोड कामगारांसाठी दोन दिवसात दुसरी गुड न्यूज!
ऊसतोड कामगारांना दसरा – दिवाळी सारख्या सणांना मिळणार खास शिधासंच
सामाजिक न्याय मंत्री असताना
मुंबई (ऑनलाईन रिपोर्टर) –
कालच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांना १५९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी ऊसतोड कामगारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने राज्यातील ४ लाख ऊसतोड कामगारांना सण उत्सव उत्साहात साजरे करण्यात यावेत, यासाठी खास मोफत शिधासंच वाटप करण्याचा निर्णय घेतला असून या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात या योजनेतून ४ लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांपैकी १ लाख कामगारांना हा शिधासंच मोफत दिला जाणार असून उर्वरित ३ लाख कामगारांना टप्प्या टप्प्याने हा शिधा दिला जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप प्राप्त होऊन कायमस्वरूपी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याचदरम्यान ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी सण उत्सव साजरे करता यावेत, यासाठी खास आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. विशेष म्हणजे त्या वेळी संबंधित विषय कॅबिनेट समोर आणण्यासाठी अवघ्या अर्ध्या तासात मान्यता दिली होती.
दरम्यान या शिधासंचामध्ये २ किलो साखर, एक किलो खाद्यतेल, एक किलो चणा डाळ, एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो पोहे अशी सुमारे ६१० रुपये किंमतीच्या खाद्य पदार्थांचा समावेश असणार आहे.
पहिल्या टप्प्यात सहा कोटी दहा लाख रुपये किंमतीच्या १ लाख शिधासंचांचे वाटप केले जाणार असून, यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यातील कामगारांचा समावेश असून बीड सह नाशिक, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव, जालना, अहिल्यानगर, परभणी या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून संपूर्ण वितरण प्रक्रियाची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दरम्यान माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह सरकारचे आभार मानले असून या योजनेतून प्रत्येक नोंदणीकृत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाला लाभ मिळावा, अशी विनंती केली आहे.









