पेठबीड ): ऑनलाईन रिपोर्टर
पेठबीड येथील पांडुरंगनगर परिसरात महिलेवर रस्त्यात अडवून शिवीगाळ करत विनयभंग व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि.11) दुपारी घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने पेठबीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोषी आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
पीडित महिला मंगळवारी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या चार वर्षांच्या नातवासह अंगणवाडीतून घरी जात असताना विश्वदत्त मंगल कार्यालयाच्या पाठीमागील गल्लीत घराशेजारी राहणाऱ्या सदाशिव धोंडीराम कोकाटे याने त्यांना अडवले. “तू आमच्यावर केलेली केस मागे का घेत नाहीस?” असे म्हणत आरोपीने शिवीगाळ सुरू केली व केस मागे घेतली नाहीस तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.
पीडित महिलेने केस मागे घेणार नसल्याचे सांगितल्यावर आरोपीने त्यांच्या केसाला धरून साडी ओढत लज्जा वाटेल असे कृत्य केले. यानंतर तोंड दाबून खाली पाडत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिला व त्यांचा नातू मोठ्याने ओरडू लागल्यावर रस्त्याने मोटारसायकल येताना दिसताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
यानंतर पीडित महिलेने ही बाब आपल्या मुलीला व नातेवाईकांना कळवली. नंतर नातवाला नातेवाईकांकडे ठेवून त्या थेट पेठबीड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या व लेखी तक्रार दिली.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पेठबीड पोलीस पुढील तपास करीत आहेत. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे








