परळी वैजनाथ : ऑनलाईन रिपोर्टर
शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि.३१) रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही कारवाई सिरसाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकारामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. दत्ता निघूळ असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याचा ऊस वाहतूक करताना काही इतर शेतकऱ्यांनी विरोध केल्याने संबंधित शेतकऱ्याने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलिस कर्मचारी दत्ता निघूळ यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पैसे स्वीकारताना संशय आल्याने संबंधित कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. मात्र लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातच संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.









