नांदेड (रिपोर्टर) — राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळाले. दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून करण्यात आलेली त्यांची बदली तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी दिव्यांगांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
“तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. दिव्यांगांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे बदली मागे घेण्याची मागणी केली. यापूर्वी मुंबईतील मंत्रालय परिसरातही दिव्यांग बांधवांनी याच मागणीसाठी आंदोलन केले होते.
दरम्यान, राज्य सरकारने अलीकडेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला असून मंगळवारी सायंकाळी ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या. त्याआधी गेल्या आठवड्यात तब्बल २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू असल्याने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.
दरम्यान, बदलीनंतर काही दिवसांतच तुकाराम मुंढे यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या अस्थी विसर्जनावेळी त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. अद्याप त्यांनी नवीन पदाचा पदभार स्वीकारलेला नाही.








