बीड, रिपोर्टर :
बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखा, बीडच्या पथकाने धाडसी कारवाई करत जेरबंद केले. आरोपीकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सोमनवाडी शिवारातील धाबा चालक विलास अंकुश चाटे हा आपल्या जवळ पिस्टल बाळगत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने १० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित धाब्यावर छापा टाकला.
छाप्यात पोलिसांनी विलास चाटे यास ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीची पिस्टल हस्तगत करण्यात आली. जप्त शस्त्राची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद भताने यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गु.र. नं. ९७/२०२६ अन्वये कलम ३/२५ आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि सुशांत सुतळे, पोलीस हवालदार गोविंद भताने, रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, तसेच पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळे आणि विकास राठोड यांनी सहभाग घेतला.






