अंबाजोगाई (रिपोर्टर): स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर डॉ. मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला पाठवलेल्या मोबाईल पासवर्डमुळे या प्रकरणातील गूढ उकलल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका मैत्रिणीकडून होत असलेल्या कथित ब्लॅकमेलमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची बाब सुसाईड नोटमधून स्पष्ट झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील चनई रोडवरील संत रोहिदास नगर परिसरात रमेश प्रल्हादराव सातपुते यांच्या घरात भाड्याने राहत असलेल्या खोलीत 6 एप्रिल रोजी पहाटे डॉ. मंदार दाभाडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या भाऊ लौकिक दाभाडे यांना मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता. अंत्यविधीनंतर लौकिक दाभाडे यांनी तो पासवर्ड वापरून मोबाईल तपासला असता त्यामध्ये सुसाईड नोट आढळून आली. त्या नोटमध्ये डॉ. दाभाडे यांनी एका परिचित महिलेबरोबर मैत्रीचे संबंध असल्याचा उल्लेख केला असून, संबंधित महिला ही तिच्या गर्भधारणेचा दावा करत लग्नासाठी दबाव टाकत होती, तसेच नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अश्लील व्हिडिओ व संदेश पाठवून मानसिक त्रास दिला जात असल्याचाही उल्लेख नोटमध्ये करण्यात आल्याचे समजते.या सततच्या मानसिक दबावामुळे आपण अत्यंत तणावाखाली गेलो असून जगण्याचा मार्गच उरला नाही, अशी भावना डॉ. दाभाडे यांनी सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. नोटमध्ये त्यांनी सॉरी पप्पा आणि भैय्या असा उल्लेख करत वडील व भावाची माफी मागितली आहे.दरम्यान, या प्रकरणी डॉ. दाभाडे यांचे भाऊ लौकिक दाभाडे यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या अनुषंगाने संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना वैद्यकीय क्षेत्रात तसेच अंबाजोगाई शहरात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे.






