बीड (प्रतिनिधी) : बीडच्या जिल्हा कारागृहातील कथित मारहाण प्रकरणाला नवा आणि धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. बुधवारी (ता. २२) व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कैदी अझर अब्दुल रहमान पठाण याला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी (ता. २३) समोर आलेल्या दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः पठाण यानेच हा दावा फेटाळून लावल्याने प्रकरण अधिकच गोंधळात टाकणारे ठरले आहे.

पहिल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड गँगशी संबंधित सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर काही कैद्यांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकारामुळे जिल्हा कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
दरम्यान, आज समोर आलेल्या कथित दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये अझर पठाण आणि एका अज्ञात व्यक्तीतील संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणात पठाण म्हणतो की, “जेलमध्ये थोडा वाद झाला होता, पण तो लगेच मिटला. काही कैद्यांनी आणि जेलमधील एका कर्मचाऱ्याने दबाव टाकून मला हे बोलायला भाग पाडले.”
तसेच, “सध्या मस्साजोग येथे निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना टार्गेट करून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात कोणतीही मारहाण झालेली नाही,” असा दावाही पठाणकडून करण्यात आला आहे.
या संभाषणात पुढे तो स्पष्ट करतो की, या प्रकरणाचा जरांगे पाटील यांच्याशी कोणताही संबंध नसून, त्यांच्या नावाचा विनाकारण उल्लेख करण्यात आला होता.
दरम्यान, या दोन्ही ऑडिओ क्लिप्सची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या सत्यतेबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, एकाच प्रकरणात दोन परस्परविरोधी ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने बीड जिल्हा कारागृहातील परिस्थिती आणि अंतर्गत घडामोडींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.







