लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी न देता इतर खात्यावर वर्ग; शासकीय दस्तऐवज गहाळ केल्याचाही आरोप
केज, प्रतिनिधी : केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीमध्ये तब्बल ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल आणि इतर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी हा केवळ पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करणे आवश्यक होते. मात्र, दि. २० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत एकूण ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये ही रक्कम लाभार्थ्यांना न देता नियमबाह्य पद्धतीने इतर खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे समोर आले.
या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत (सेवानिवृत्त) यांनी लेखापाल व इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने निधी वळविल्याचा आरोप आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नगरपंचायत केज यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे सादर केला.
जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने सखोल तपासणी करून सादर केलेल्या अहवालात शासनाचे कोणतेही निर्देश नसताना नियमबाह्य पद्धतीने निधी इतर खात्यांवर वर्ग करून शासकीय रकमेचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित गणपतराव ढोपे यांनी पोलीस ठाणे, केज येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत, तत्कालीन लेखापाल असद इसाकोद्दीन खतीब, कंत्राटी लेखापाल सहाय्यक लक्ष्मण मारोती जगताप (सेवानिवृत्त), व्हॉल्वमन भास्कर एकनाथ ससाणे, भीमराव शामराव मस्के आणि बासेद वलीयोद्दीन काझी या सहाजणांविरुद्ध गु.र.नं. २३६/२०२६ अन्वये भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, २०१, २०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घरकुल घोटाळ्याच्या प्रकरणामुळे केज नगरपंचायत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







