बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचाही निषेध; डॉ. गणेश ढवळे यांचे नेतृत्व
बीड, प्रतिनिधी : शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तसेच पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. याचवेळी बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित तथ्यहीन वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. २५ एप्रिल) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडले.
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तक न वाचताच आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच कोल्हापूर येथील पुस्तक वितरक प्रशांत आंबी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार संजय गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच तातडीने अटक करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते आणि त्यांनी राज्यकारभार रामदास स्वामींकडे सोपविला, असे कथित वक्तव्य केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. या वक्तव्याचाही तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांना निवेदन पाठविण्यात आले.
या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, बाळकृष्ण थोरात, श्रीहरी निर्मळ, भगवान मोरे, रामचंद्र मुळे, सुरेश निर्मळ, सुरज कदम, संतोष भोसले, दादा गायकवाड, दिपक थोरात, गुलाब कांबळे, पप्पू निर्मळ, रावसाहेब निर्मळ, भालचंद्र कुदळे आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.











