बीड | रिपोर्टर
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) पथकाने धडक कारवाई करत एका हप्त्यात तब्बल तीन बालविवाहांचे गुन्हे दाखल केले आहेत. बालविवाहित मुलींना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले असून, संबंधित पालक, नवरदेव आणि नातेवाईकांविरोधात पोस्टे बीड ग्रामीण, पिंपळनेर आणि केज येथे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी AHTU च्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दहीफळ ता. जि. बीड येथे सकाळी 10:30 वाजता एका 15 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे.
माहितीच्या आधारे PSI पल्लवी जाधव या AHTU पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. लग्न मंडपात मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळींची गर्दी असल्याने त्यांनी सापळा रचत दोन महिला अंमलदारांना वेषांतर करून बालविवाहित मुलीला ताब्यात घेण्यास सांगितले, तर दोन पुरुष अंमलदारांना नवरदेवाला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर PSI जाधव यांनी मंडपात प्रवेश करून स्वतःची ओळख सांगितली व कारवाईचे कारण स्पष्ट केले. पोलीस आल्याचे समजताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले. उपस्थित वऱ्हाडी मंडळींना बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.
पीडित मुलीचे समुपदेशन करून तिची विचारपूस केली असता, तिचा विवाह इरफान बेग अन्सार बेग (वय 24, रा. माळपुरी ता. जि. बीड) याच्यासोबत झाल्याचे समोर आले. त्यानंतर पीडित मुलगी, तिचे आई-वडील, नवरदेव, त्याचे आई-वडील व इतर नातेवाईकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी ग्रामसेवक दहीफळ यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या प्रतिनिधी सलमान खाजा शेख यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. त्यांच्या तक्रारीवरून पोस्टे पिंपळनेर येथे कलम 9, 10, 11 बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये 10 आरोपींसह 15 ते 20 वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, त्याच दिवशी दुपारी जोला ता. केज येथेही बालविवाहाची माहिती मिळाल्याने AHTU पथकाने तत्काळ धाव घेत बालविवाहित मुलगी व तिच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोस्टे केज येथे नवरदेव श्रीकांत जाधव, त्याचे आई-वडील व इतर नातेवाईकांविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच, 18 एप्रिल 2026 रोजी सोनगाव ता. जि. बीड येथे 15 वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर AHTU पथकाने कारवाई करत पीडित मुलगी, तिचे पालक, नवरदेव, त्याचे पालक व इतर नातेवाईकांविरोधात पोस्टे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला.
अशा प्रकारे एका हप्त्यात तीन बालविवाहांचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, मागील चार महिन्यांत AHTU बीडने एकूण सात गुन्हे नोंदवले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, उषा चौरे, पोलीस हवालदार शोभा जाधव, प्रदीप येवले, अशोक शिंदे, चालक पोशी भाऊसाहेब जाधव व अक्षय जाधव यांच्या पथकाने पार पाडली.







