शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत प्रवेश देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश
बीड (रिपोर्टर) बीड तालुक्यातील आदर्श महिला मंडळ संचलित विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यताच चक्क शिक्षण विभागाने रद्द केल्याने शिक्षण क्षेत्रात आणि संस्था चालकात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील ढेकणमोहापासून जवळ असलेल्या काळेगाव हवेली येथे आदर्श महिला मंडळ, बीड संचलित विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेबाबत अनेक तक्रारी गावकरी आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शिक्षण संचालकांकडे केल्या होत्या. केलेल्या तक्रारीची दखल घेऊन या तक्रारीत तथ्य आढळल्याने राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी 20 जुलै 2022 रोजी या शाळेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे आदेश संस्थेला आणि शिक्षण विभागाला दिले आहेत. आदेश देऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आला असला तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षण विभागाकडून याबाबत कारवाई करण्यात आलेली नव्हती. या शाळेची मान्यता रद्द करताना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अधिनियम 2009 नुसार या शाळेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील, उपसंचालक डॉ. साबळे यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याच्या आदेशात म्हटले आहे. चक्क शाळेची मान्यता रद्द झाल्याने शिक्षण क्षेत्रात आणि संस्था चालकात खळबळ उडालेली आहे. संस्था चालकांनी सरकारचे अनुदान घेताना सर्व नियमांचे पालन करावे, पालन केले नाही तर शाळेची मान्यता सुद्धा रद्द होऊ शकते, असा संदेश शिक्षण संचालकांनी जणू या आदेशाने संस्था चालकांना दिला आहे.