बीड (रिपोर्टर) तालुक्यातील बेलेश्वर संस्थान येथील मंदिरातील पंचधातूचे व पितळाचे मुकुट चोरी गेल्याची घटना घडल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे यांनी आज सकाळी बेलेश्वर संस्थानला भेट दिली. सदरील चोरीचा तात्काळ तपास करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रा. सुनील धांडे यांनी दिला.
काल बीड तालुक्यातील बेलेश्वर संस्थान येथील मंदिरात चोरी झाली. अज्ञात चोरट्याने देवाला लक्ष्य करत पंचधातूचे व पितळाचे मुकुट चोरून नेले. सदरची घटना अत्यंत संतापजनक आणि भक्तांना वेदना देणारी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप चोरट्यांचा शोध पोलिसांनी लावला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवसेनेचे माजी आ. प्रा.सुनील धांडे यांनी आज सकाळी बेलेश्वर संस्थान येथे भेट दिली. या वेळी ह.भ.प. महादेव भारती महाराज, सरपंच अश्विन शेळके, आकाश शेळके यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. सदरील चोरीचा तपास तात्काळ करावा, अशा आशयाची मागणी पोलीस उपअधिक्षक वाळके यांच्याकडे करून प्रा. धांडे यांनी या घटनेचा निषेध केला. सदरील चोरी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करत सदरील प्रकरणात प्रशासनाने ढिलाई दाखवल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी धांडे यांनी दिला.










