गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळी माजलगाव तालुक्यात पाऊस झाल्याने यात ज्वारी हरभरा व इतर पिकाचे नुकसान झाले. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.
दरवर्षी शेतकर्यांना कुठल्या ना कुठल्या संकटांना तोंड द्यावे लागते. यंदा रब्बी पिकं जोमाने आली होती. खळं करण्याला काही दिवसांचा अवधी उरला होता. तोच तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. या पावसाने शेती पिकाचे नुकसान होऊ लागले. आज सकाळी माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, पपई, पालेभाज्या यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याची दखल घेऊन महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. राज्य सरकारने शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई घोषीत करावी, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.