बोगस प्रमाणपत्र धारकांना मेडिकल बोर्डाकडे पाठवणार
बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो. अनेक शिक्षकांनी अपंगाचे बोगस प्रमाणपत्र काढून शिक्षकाची नोकरी हस्तगत केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आल्याने त्यांनी उद्या जवळपास तीनशे अपंग शिक्षकांची सुनावणी ठेवलेली आहे. या सुनावणीमध्ये संबंधित शिक्षकांचे कागदपत्र तपासून शंकायुक्त अपंग शिक्षक यांना पुन्हा तपासणीसाठी अंबाजोगाई येथील मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षण विभागातील सुत्राने सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी अनेकांनी क्रीडाचे काही बोगस प्रमाणपत्र काढलेत, काहींनी अपंगाचे बोगस प्रमाणपत्र काढल्याच्या चर्चा नेहमीच शिक्षण विभागात चर्चीले जाते. तत्कालीन शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनी काही अपंग शिक्षकांना त्यावेळेस निलंबीतही केले होते, काहींच्या वेतनवाढी रोखल्या होत्या, आताही शिक्षण विभागात जवळपास तीनशेच्या आसपास अपंग शिक्षक आहेत. काहींची प्रमाणपत्रेही बोगस असल्याची चर्चा शिक्षण विभागात होत असल्याने उद्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अपंग शिक्षकांची कागदपत्रांसह सुनावणी ठेवली आहे. ज्या शिक्षकांची प्रमाणपत्रे शंकायुक्त वाटतील, अशा काही शिक्षकांना पुन्हा तपासणीसाठी अंबाजोगाई येथील मेडिकल बोर्डाकडे पाठविले जाईल, असे सुत्रांनी सांगितले. या अपंग शिक्षकात कानाने ऐकू येत नसल्याचे प्रमाणपत्र काढलेले शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत. बोगस प्रमाणपत्रधारक शिक्षकांत यामुळे भितीचे वातावरण निर्माण झालेआहे.