क्रीडांगण परिसरात विजेचा बंदोबस्त न केल्यास क्रीडाप्रेमी आंदोलन छेडणार
बीड (रिपोर्टर) छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात लाईट नसल्यामुळे अंधारातच नागरिकांना वॉकिंग करावी लागते. अंधाराचा गैरफायदा घेऊन याठिकाणी अनुचीत प्रकार घडू शकतो. पुढील अनर्थ टळावा यासाठी न.प.च्या सीओंनी वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी क्रीडा प्रेमींतून होत आहे. दरम्यान नगरपालिकेने दोन दिवसात लाईट न लावल्यास क्रीडाप्रेमी न.प.च्या विरोधात उपोषणाला बसणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या क्रीडांगणासह छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियमवरही सुविधांचा अभाव असून त्याठिकाणी सुविधा देण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेसमोर छत्रपती संभाजी क्रीडांगण (मल्टी पर्पज) या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान अनेक नागरिक वॉकिंगला जात असतात. यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. क्रीडांगण परिसरात लाईट नसल्यामुळे नागरिक स्वत:च्या मोबाईलद्वारे उजेड करत वॉकिंग करत असतात. नगरपालिका प्रशासन नेहमीच विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत असते. मात्र न.प कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रीडांगणात लाईट नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्रीडांगण परिसरात अंधारामुळे अनुचीत प्रकार घडू शकतो. वेळीच न.प.चे सीओ व न.प. प्रशासकीय अधिकार्यांनी दखल घेऊन तात्काळ लाईटींग बसवावी, अशी मागणी क्रीडा प्रेमींकडून केली जात आहे. विजेचा बंदोबस्त तात्काळ न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा नागरिकांनी दिला. ज्या प्रमाणात या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे तशीच अवस्था छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुद्धा आहे. तेथेही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
आ. संदीप क्षीरसागर साहेब,
क्रीडांगणाच्या सुविधेकडे लक्ष द्या
बीड शहरातल्या सुविधेबाबत आ. संदीप क्षीरसागर नेहमीच सतर्क असतात. मध्यंतरी त्यांनी क्रीडांगणामध्ये जाऊन तेथील सुविधांची पाहणीसुद्धा केली होती. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात विज नाही. त्याठिकाणी विजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना ते नगरपालिका प्रशासनाला तात्काळ देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आ. क्षीरसागरांनी दोन्ही क्रीडांगणाच्या सुविधेबाबत संबंधित प्रशासनाला निर्देशित करण्याची मागणी केली जात आहे.