बीड (रिपोर्टर) बीड नगर पालिकेला पहिल्यांदाच एक महिला मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांनी पदभार घेतला आहे. पदभार घेतल्यापासून त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला असून पहिल्याच दिवशी त्यांनी नगरपालिकेतील सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन चोख काम करा, नसता माफ करणार नाही, असे सुनावत कामाच्या सुधारणेबाबत काही सूचनाही केल्या. आसेफनगर भागातील गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या पुलाच्या कामाला तात्काळ भेट देत यंत्रणा कामाला लावत काम सुरू केले तर शहरातील स्वच्छता विभागाच्या कर्मचारी आणि कामगारांना सूचना देत शहर स्वच्छतेकडे लक्ष दिले. काही ठिकाणी पहाटेच्या दरम्यान स्वच्छता कामगार करतात की नाही याची दस्तुरखुद्द पाहणी केली.
बीड नगर पालिका प्रशासनातील संचालक असलेल्या नीता अंधारेंची बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली. श्रीमती अंधारे या पहिल्याच मुख्याधिकारी. नगरपालिकेसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे होते. पदभार घेताच मुख्याधिकारी अंधारे यांनी सर्व विभागांच्या खातेप्रमुखांची बैठक घेतली. सर्व कर्मचार्यांना विश्वासात घेतले. विशेषत: स्वच्छता विभाग आणि पाणीपुरवठा विभागाकडे विशेष लक्ष दिले. जे कर्मचारी काम करतील त्यांच्या पाठीशी प्रशासक म्हणून खंबीरपणे उभा राहिल, असा विश्वास दिला तर हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्याला माफीही मिळणार नाही, असेही अप्रत्यक्षपणे संदेश दिला. पदभार घेतल्यापासून त्या कार्यालयीन वेळेत पुर्णवेळ बसतात. त्यामुळे नागरिकांना मुख्याधिकारी अंधारे या सहज उपलब्ध होतात. त्यासोबतच 3 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नगरपालिके-अंतर्गत सर्वच बचत गटांच्या महिलांची बैठक घेऊन त्यांना कायदे तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देत साफसफाई होते की नाही हेही बघितले. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान साफसफाई कर्मचारी खरच काम करतात की नाही यालाही सरप्राईज भेटी दिल्या. त्यामुळे कर्मचारीही आपल्या कामात हलगर्जीपणा करत नाहीत. त्यामुळे एक महिला मुख्याधिकारी असताना नगरपालिकेचे कामे गतीने मार्गाला लागत आहेत. इथून पुढेही मी शहर स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याकडे विशेष लक्ष देईल, शक्यतो आठ दिवसाला बीड शहरवासियांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळेल याकडेही प्राधान्याने लक्ष देईल, असे त्यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.










