बीड (रिपोर्टर) बीड येथील सनदी लेखापाल अंकित जैस्वाल व पुजा मेहता (सीए) यांच्या विरुद्ध विनयभंग खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश बीड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.
येथील रहिवाशी असलेले पती-पत्नी अंकित सुरेंद्र जैस्वाल व त्यांची पत्नी पुजा प्रकाा मेहता यांनी दि. 10 जानेवारी 2022 रोजी निखिल सुरेंद्र जैस्वाल (रा. जालना रोड, बीड ता. जि. बीड) यांच्या घरात जाऊन त्यांना मारहाण केली व घरातील सिलेंडरचा पाईप कापला. तसेच फिर्यादीची पत्नी ही दरवाजा लावत असताना तिचा विनयभंग करून तिला मारहाण केली. बाहेर जात असताना आरोपींनी घरात पेटती काडी फिर्यादीच्या दिशेने फेकली व ती काडी रुममधील गादीवर पडली आणि आरोपीने जाताना घराचा दरवाजा बंद करून ते पळून गेले. आरोपीने टाकलेल्या काडीमुळे घरातील बेडशीट आणि उशीने पेट घेतला. सदर घटनेची फिर्याद देण्यासाठी फिर्यादी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बीड येथे गेले असता त्यांनी त्यांची फिर्याद घेतली नाही आणि त्यामुळे त्यानंतर दि. 19 जानेवारी 2022 रोजी त्याने लेखी फिर्याद पोलीस अधिक्षक यांना दिली. परंतु त्यांनी सुद्धा फिर्यादीची तक्रार दाखल न केल्याने फिर्यादीने बीड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर अॅड. सचिन अ. आबुज मार्फत फिर्याद न्यायालयात दाखल केली. सदर फिर्यादीच्या अर्जावर फिर्यादीचे वकील अॅड. सचिन आबुज यांनी केलेल्या युक्तीवाद व दाखविलेला पुरावा पाहून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांनी दि. 7 जानेवारी 2023 रोजी शिवाजी नगर, पोलीस स्टेशनला आरोपी अंकित जैस्वाल व पुजा मेहता यांच्या विरुद्ध कलम 153 (3) सीआरपीसी प्रमाणे गुन्हा नोंद करावा, असे आदेश पारीत केले आहे. सदर आदेशावरून शिवाजीनगर ठाण्यात वरील दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 307, 452, 354 – अ, 354 – ब, 323, 436, 427, 504, 506 सह 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. फिर्यादी मार्फत अॅड. सचिन आबुजा यांनी काम पाहिले त्यांना अभिजीत गलधर यांनी सहकार्य केले.