पिंपळनेर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच
दिनेश मतेची निर्घृण हत्या
पोलिसांनी फिर्याद घेतली असती तर दिनेशचा जीव वाचला असता
पिंपळनेर ठाण्याचे सीसीटीव्ही तपासा
फिर्याद न घेणार्या पीएसओसह फिर्यादीलाच मारहार करणार्या पोलिसांवर कारवाई करा
बीड (रिपोर्टर) मारहाण झालेला व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी त्याला हुसकावून लावले. त्याच रात्री तो बेपत्ता झाला आणि अखेर त्याचा मृतदेह एका तलावात मिळाला. सदरच्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना पिंपळनेर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली असून मयत दिनेश मते याची हत्या केवळ पिंपळनेर पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळेच झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. तशी लेखी तक्रार मयताच्या पत्नीने पोलिसात केली. या प्रकरणात तीन आरोपी अटकेत असले तरी दोषी पोलिसांवर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही.
याबाबत अधिक असे की, मयत दिनेश श्रीमंत मते (रा. शहाजानपूर लोणी) याचे 17 जानेवारी रोजी काही लोकांशी भांडण झाले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत दिनेश पिंपळनेर पोलिसात फिर्याद देण्यासाठी आला. त्यावेळी त्याची फिर्याद घेतली गेली नाही. पोलिसांच्या मते तो दारू पिलेला होता म्हणून फिर्याद घेतली नसल्याचे म्हटले. विशेष म्हणजे त्याा मारहाण करणारेही फिर्याद देण्यासाठी पोलिस ठार्यात आले होते. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही तपासले तर त्यामध्ये पोलिसांनी संबंधित व्यक्तीला दिलेल्या वागणुकीचे सत्य समोर येईल. फिर्याद न घेता दिनेशला हुसकावून लावल्यानंतर दिनेश त्याच दिवशी बेपत्ता झाला. ही फिर्याद देण्यासाठीही त्याच्या घरचे पिंपळनेर पोलिस ठाण्यात आले. आदल्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगितला मात्र पोलिसांनी तेव्हाही फिर्यादीकडे दुर्लक्ष केले. शेवटी 19 तारखेला दिनेश मतेचा मृतदेह लिंबारुई येथील तलावात आढळून आला. त्याचा गळा चिरून मारेकर्यांनी त्याची हत्या केली होती. इथेही पोलीस अत्यंत शांतपणे काम करत होते, मात्र जेव्हा मतेच्या नातेवाईकांनी आक्रमक होत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली तेव्हा पिंपळनेर पोलिसांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. मयत दिनेशला मारहाण करतानाचे फुटेज एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना मिळून आले. त्या आधारावर पोलिसांनी महारुद्र सत्यप्रेम मते, मुरलीधर अंबादास लांडे, गोपीचंद मोतीराम लांडे या तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र ही हत्या केवळ पिंपळनेर पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळेच झाल्याचे घटनाक्रमावरून दिसून येते. यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
एसपी नंदकुमार ठाकूर, खात्याची इज्जत वाचवा
हत्येला जबाबदार पोलिसांवर कारवाई करा
पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ओल्या दिनेशची फिर्याद घेतली असती, मारेकर्यांची कानउघडणी करत पोलिसी खाक्या दाखवला असता तर कदाचीत दिनेशची हत्या झाली नसती. सदरचे प्रकरण जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गांभीर्याने घेत फिर्याद न घेणार्या पीएसओ ठाणे अंमलदारावर संबंधित फिर्यादीलाच मारहाण करणार्या पोलिसांवर तात्काल निलंबनाची कारवाई करावी, केवळ पोलिसांमुळेच ही हत्या झाल्याचे संपुर्ण घटनाक्रमावरून दिसून येते.