नेकनूर (अमजद पठाण)- गुजरात राज्यातून बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत असलेला लाखो रुपयांचा गुटखा आज भल्या सकाळी सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी पकडला. सदरची ट्रक ही चौसाळा ते बीड रोडवर उदंडवडगाव नजीक आली असता कुमावत व त्यांच्या अधिकारी, कर्मचार्यांनी ती अडवून त्याची तपासणी केली असता आतमध्ये तब्बल 40 पोते म्हणजेच 36 लाखांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघे जण पोलिसांच्या ताब्यात असून अन्य तिघे फरार आहेत.
गुजरात, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात बीडसह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्रासपणे येतो. गुटखा माफिये महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या संगनमतातून तो गुटखा विक्री करतात. बीड जिल्ह्यात सातत्याने गुटख्यावर कारवाया होत असताना मोठ्या प्रमाणावर गुटखा बाहेर राज्यातून बीडमध्ये येत असल्याचे पुन्हा एकदा आजच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. गुजरातमधून बीड जिल्ह्यात गुटखा येत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी चौसाळा ते बीड रोडवर सापळा रचला. गुटखा घेऊन येणारे दहा टायर ट्रक क्र. जी.जे. 12 ए.वाय. 9495 क्रमांकाची गाडी उदंडवडगाव जवळ निदर्शनास आली. त्यावेळी पोलीस पथकाने तिची तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटखा 40 पोते आढळून आला. या गुटख्याची किंमत तब्बल 36 लाख असून सदरची ट्रक ताब्यात घेऊन नेकनूर पोलिस ठाण्यात लावली. या प्रकरणी कुमावत यांच्या पथकातील बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 28/2023 कलम 328, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनास्थळावर ट्रक चालक वजीर इम्रान गुलमोहम्मद (रा. शुक्पररोहा ता. नखतराणा, जि. भुज कच्छ, राज्य गुजरात), समीर सुलतान मोतीयार (क्लिनर) (रा. शुक्पररोहा ता. नखतराणा जि. भुजकच्छ) यांना ताब्यात घेतले तर साजीद युसुफ मेमन हा गुजरातमधील व्यक्ती फरार असून यासह नकुल पंडित ऊर्फ साळवी, बीड येथील व्यापारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 36 लाखांच्या गुटख्यासह 15 लाख किमतीचा ट्रक, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा 51 लाख 20 हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे. सदरची कावाई ही सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, व त्यांच्या पथकातील पो.कॉ. बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजवीर वंजारे, विठ्ठल चोपणे, संजय टुले, यांनी केली.