खोळंबलेले प्रशासकीय कामे गतीने मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश
बीड (रिपोर्टर) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होऊन आचारसंहिता संपलेली आहे. त्यामुळे 31 मार्च 2023 पूर्वी जिल्हा नियोजन मंडळ आणि इतर सर्व निधी खर्च करा, आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या सर्व प्रशासकीय मंजुर्या तात्काळ द्या, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत.
काल दुपारी पाच वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी आणि खातेप्रमुखांशी संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्परन्सला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष ररूत यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाने वार्षीक आराखड्यात तरतूद केलेल्या निदीचा खर्च झाला नाही. राज्य शासनाकडून काही निधी जिल्हाधिकार्यांना दिलेला आहे. या निधीसह इतरही प्रशासकीय कामे खोळंबलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव यांनी नियमित प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत 31 मार्च संपायला दीड ते पावणे दोन महिने बाकी आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 मार्चपूर्वी हा निधी खर्च करा आणि खोळंबलेली प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत.