पुणे (रिपोर्टर) पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो गौप्यस्फोट केला आहे, त्याविषयी आज पत्रकारांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. मात्र, आता यावर मी काही बोलणार नाही. मला देवेंद्र फडणीसांचे महत्त्व वाढवायचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी उत्तर दिले.
शरद पवार आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी केला, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याबाबत आज पत्रकारांनी विचारताच, मी काहीच बोलणार नाही, मला फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी फडणवीसांना फटकारले.
पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवारही मैदानात उतरले आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची सभा येत्या 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत होणार आहे. तर, तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी याच दिवशी सकाळी 11 वाजता होणार शरद पवारांची सभा पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत मविआकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहेत. पत्रकारांनी प्रचारासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा तर दुसर्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे. पण, दोन्ही उमेदवार मविआचे आहेत. त्यामुळे एका ठिकाणी प्रचाराला गेल्यावर दुसर्या ठिकाणी जावेच लागते, असा टोला पवारांनी लगावला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी 22 फेब्रुवारीरोजी पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.