बीड (रिपोर्टर) एका वयवृद्ध दाम्पत्याच्या घरातून आठ तोळे सोने आणि रोख 16 हजार 800 रुपये चोरीला गेल्याची घटना काल दुपारी बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत आसपासच्या लोकांकडे विचारपूस केली होती. तर काहींना पोलिसांनी खाक्याही दाखविल्या होत्या. आज सकाळी चोरीला गेलेले 8 तोळे सोने आणि रोख 16 हजार 800 रुपये चोरीला गेलेल्या ठिकाणावर चोरट्यांनी आणून ठेवले.
लताबाई हरीहर काळे (रा. धांडे गल्ली) या आपल्या वयोवृद्ध पतीसह राहतात. त्यांचा मुलगा पुणे येथे आहे. काल दुपारी त्या अंघोळीला गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील 8 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. लताबाईंना आपल्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी बीड शहर पोलिसांना याची माहिती दिली. त्यावरून डीबी पथकाचे बाळासाहेब सिरसाट, मनोज परझणे, अशफाक सय्यद यांनी शहर ठाण्याचे प्रमुख रवी सानप यांच्या मार्गदर्शनानुसा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून वेगाने तपास सुरू करत काहींना खाक्याही दाखविला. आज सकाळी चोरीला गेलेले सर्व दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरात आणून टाकले. बीड शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच वयोवृद्ध दाम्पत्याला आपले दागिने परत मिळाले.