Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- मोदींचा सर्वसामान्यांच्या विश्‍वासावर सर्वथैव बलात्कार

अग्रलेख- मोदींचा सर्वसामान्यांच्या विश्‍वासावर सर्वथैव बलात्कार

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
आपल्याला गौरवशाली भारत घडवायचा आहे, यासाठी निस्वार्थी नेत्यांच्या आदेशाचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. या स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर अखंड भारतवासियांनी २०१४ साली लक्ष केंद्रित करून नरेंद्र मोदी यांचे नि:स्वार्थ नेतृत्व स्वीकारले. गेल्या सत्तर वर्षांच्या कालखंडात अपवाद काही वर्षे वगळता कॉंग्रेसने सत्ताकारण केले. या कार्यकाळात मुलभूत गरजा पुर्ण होऊ शकल्या नाहीत. म्हणून नवनेतृत्व भारताच्या नागरिकांनी जगासमोर आणलं आणि या नेतृत्वानेही अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भय आणि भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्याचे अभिवचन अखंड भारताला दिले. परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होताच गौरवशाली भारत घडवण्याच्या वल्गणा भरपूर झाल्या. त्यात सर्वसामान्य भारवासियांना काय मिळालं हा जेव्हा विषय समोर येतो तेव्हा अठराविश्‍व दारिद्य्र अन् भिक नको पण कुत्रं आवर म्हणण्याची वेळ देशवासियांवर आली. गेल्या सात वर्षांच्या कालखंडामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ज्या काही निर्णय प्रक्रिया झाल्या त्या लोक हिताच्या असण्यापेक्षा धनदांडग्यांच्या आणि शेठजींच्या हिताच्या अधिक असल्याचे समोर आले. २०१४ ते २०२१ चा हा कालखंड आणि भारतातली महागाई व बेरोजगारी पाहितली तर सर्वास पोटास लावणे तर सोडा सर्वास भिकास लावणे हे धोरण मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात आखलं जात असल्याचे उघडपणे स्पष्ट होते. होय, आम्ही अत्यंत विचारपुर्वक हे भाष्य करतोय, धनदांडग्या उद्योग-व्यवसायिक यांच्यापेक्षा कितीतरी पटीने कर हा सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाने भरल्याचे आज सिद्ध होते.


पेट्रोल आणि
डिझेलची भाववाढ

त्यामध्ये असलेला अतिरिक्त कर हा प्राप्तीकरापेक्षा किती तरी पटीने जास्त असल्याचे समोर आले आहे. २०२०-२१ च्या कार्यकाळामध्ये केेंद्र सरकारला प्राप्तीकराच्या स्वरुपात देशातील नागरिकांनी ४ लाख ६९ हजार २२६ कोटी अदा केले आहेत तर पेट्रोल-डिझेलवर एक्साईज आणि व्हॅटच्या स्वरुपात ५ लाख २५ हजार ३२५ कोटी अदा केले आहेत. जगभरातला हा एकमेव असा देश असेल ज्या देशातील नागरिकांनी प्राप्तीकरापेक्षा केवळ एखाद्या वस्तूवर अधिक कर भरला. जे अंधभक्त आणि मोदीभक्त पेट्रोल शंभर रुपये झाले तरी आम्ही मोदीचाच जयजयकार करू, ही भाषा करत सर्वसामान्यांना आणि गोरगरिबांना ‘मोदींना विरोध करायचा धंदा बनवलाय’, असं म्हणतात तेव्हा अशा अंधभक्तांना या साध्या पेट्रोलच्या आकडेवारीवरून आम्ही एवढच सांगू, जेवढे काही उद्योग-धंदे-व्यापार करणारे लोक टॅक्स भरत नसतील त्यापेक्षा जास्त सर्वसामान्यांनी पेट्रोल-डिझेल खरेदी करून मोदी सरकारला टॅक्स अदा केला. आम्ही एका अर्थ तज्ज्ञाच्या हवाल्याने हे स्पष्ट सांगतो, ते अर्थ तज्ज्ञ अरुणकुमार सांगतात, ‘पेट्रोल-डिझेलवरील कर हा अप्रत्यक्ष कर असतो, अर्थ शास्त्रात याला रिग्रेरेसिव्ह टॅक्स मानले जाते. उत्पन्नाच्या प्रमाणात पाहिले तर गरिबांसाठी कराचे हे प्रमाण अधिक असते. महाग इंधनामुळे महागाई वाढते शिवाय कमाईचा बराच भाग यावर खर्च झाल्याने लोकांचे उत्पन्न कमी होते, खासगी मागणी कमी होते ही भरपाई सरकारी मागणीतून पुर्ण होऊ शकत नाही. सरकारने प्रत्यक्ष करातूनच उत्पन्न वाढवावे आणि पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा’, हे अर्थ तज्ज्ञ सांगतात. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर्ज कमी केले नाही तर भविष्यात महागाई आणि बेरोजगारी भस्मासुरासारखी आ वासून एखाद्या राक्षसासारखी सर्वसामान्याच्या छाताडावर आजपेक्षा अधिक थयाथया नाचेल. आज मितीला पेट्रोलचे दर इतिहासात कधी नव्हे एवढे १०४ रुपये प्रति लिटर तर डिझेल शंभरीच्या घरात गेले आहे आणि यामध्ये राज्यापेक्षा केेंद्र ज्या पद्धतीने अतिरिक्त कर वसूल करत आहे तो कर म्हणजे जनतेवर


सर्वथैव
बलात्कार

म्हणावा लागेल. या अखंड हिंदुस्तानात आजपर्यंत अनेक राजे, समाजसुधारक, राजकारणी होऊन गेले, त्यांनी रयतेसाठी, जनतेसाठी लोक कल्याणकारी निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ, त्यांचा राजकारभार जगभरात प्रसिद्ध आहे. रयतेसोबत वागताना महाराज आपल्या आज्ञातपत्रात म्हणतात ‘कदाचित एखादे जे झाड बहुत जिर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून न्यावे, बलात्कार सर्वथैव न करावा,’ महाराज आपल्या सैनिकांना सक्त सूचना देतात, एखादे झाड हवे असेल तर जीर्ण झाड घ्या तेही शेतकर्‍यांची परवानगी घ्या, त्याचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना द्या. बळजबरीने त्याच्याकडून काहीही घेऊ नका, त्याच्यावर ‘बलात्कार, अत्याचार, बळजबरी’ करू नका. आपल्या राज्यातील, आपल्या देशातील रयतेबाबतचा हा कनवळा आणि राज्य करण्याची पद्धत ही लोकहिताची होती. परंतु ‘घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ ही घोषणा देणार्‍या भाजपयींना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कारभार का आठवत नाही. केवळ भाजपाचे समर्थन करणार्‍या, मोदींचे समर्थन करणार्‍या लोकांसाठी आम्ही ऑक्टोबर इ.स. १६६२ रोजी सर्जेराव जेधेंना शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या पत्राचाही दाखला देत आहोत. महाराज म्हणतात, तुमच्या इलाक्यात मोगल फौज येत असल्याची बातमी हेरांनी दिली आहे, त्यामुळे इलाख्यातील सर्व रयतेला लेकरं-बाळांसह घाटाखाली सुरक्षित जागा असेल तेथे पाठवणे, या कामात हयगय करू नका. यात हयगय कराल तर तुमच्या माथी रयतेचे पाप बसेल. गावोगावी हिंडून शेतपोत जतन करण्याचे हित जोपासावे, या कामात दक्षता बाळगावी, परचक्रापासून शेती आणि शेतकरी वाचले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेबाबतची काळजी आज देखील पथदर्शक आहे. असे असताना मोदी सरकार अखंड भारतवासियांची काळजी घेतात की, निवडणुकासह


सत्ताकारणाची
काळजी?

घेतात हे गेल्या सात वर्षांच्या कालखंडामध्ये दिसून आले आहे. अखंड देशावर कोरोनाचे पराचक्र आले, जो तो भयभीत झाला. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उत्पन्नात घट झाली, अनेकांना खायला मिळाले नाही अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने भारतीयांची काळजी घेण्यापेक्षा निवडणुकांची काळजी घेत सत्ताकारणाचे जे बिजावरोपण करताना आपण पाहितले ते देशाला अक्षरश: खड्‌ड्यात घेऊन जाणारे ठरले. कोरोना हा संसर्ग आहे हे माहित असताना निवडणुका घेणे ही रयतेची काळजी नव्हे तर रयतेवर सर्वथैव बलात्कारच मानावा लागेल. आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. घराघरातल्या किचनमध्ये महागाईचा भडका गॅसच्या भडक्यापेक्षा अधिक मानला जात आहे. अशा परिस्थितीमध्येेही केंद्र सरकार अच्छे दिनची गुहार देत आम्ही केले ते सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करत असेल तर यापेक्षा निर्बुद्धी ती काहीच नसेल. नोटबंदी आणि त्यानंतर देशात सुरू झालेली आराजकता ही महागाईच्या रुपाने भस्मासूरसदृष्य गावागावात बाहेर पडत आहे आणि या स्थितीला आवरण्यापेक्षा केंद्र सरकार सत्ताकारणाची गोळाबेरीज ठिकठिकाणी करत असेल तर उद्या या देशात


गरिबी नाही
तर गरीब संपेल

हे त्रिवार सत्य आज मितीला नाकारता येणार नाही. पेट्रोल आणि डिझेल याची न भूतो ना भविष्यती सातत्याने होणारी दरवाढही देशातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला अप्रत्यक्षरित्या आर्थिकदृष्ट्या कंगाळ करणारी आहे. देशपातळीवरील पेट्रोल-डिझेलची आकडेवारी आणि केंद्र सरकारची नफेखोरी पाहितली तर इंधनावरील करातून केंद्र सरकारला या सात वर्षात दुपटीने कमाई सुरू झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव हे वाहनधारकांपुरते वाढलेले नसतात तर कच्च्या मालाच्या आवक-जावकेसह शेतकर्‍यांच्या भाजीपाल्यावरही वाढलेले असतात. हे साधे गणित सर्वांना माहित असताना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत ना सरकार ना सर्वसामान्य गपगुमान सहन करतो. याचा एक अर्थ मोदींवरची ही आंधळी श्रध्दा आणि याचा दुसरा अर्थ ही मोदींबाबत वादळापुर्वीची स्मशान शांतता असे शकते. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि त्या दरवाढीतून आकारला जाणारा कर ही जनतेची फसवणूक नव्हे तर लूट म्हणता येईल. ज्या श्रध्देने, ज्या आशेने, ज्या अपेक्षेने देशवासियांनी नरेंद्र मोदींचे नेतृत्व स्वीकारले त्या आशा-अपेक्षांना हरताळ फासत भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी या सात वर्षांच्या कालखंडात देशवासियांवर सर्वथैव बलात्कारच केला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!