पंकज कुमावतांची कारवाई
बीड (रिपोर्टर) सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिग्रस (ता. परळी) येथील गोदा पात्रातून अवैध वाळुचा उपसा होत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्री दीड वाजता आपल्या पथकाला पाठवून त्याठिकाणी छापा मारला. या वेळी वाळू उपसताना एक केनी, दोन ट्रॅक्टर आणि लोकेशन देण्यासाठी असलेली एक दुचाकी पोलिसांनी जप्त करत एकाच्या मुसक्या बांधल्या.
सुभाष नाटकर असे ताब्यात घेतलेल्या वाळू माफियाचे नाव आहे. तो गोदावरी पात्रातून केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करून त्याची चोरटी वाहतूक करीत होता. याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्री दीड वाजता आपल्या पथकाला त्या ठिकाणी पाठवले. त्या वेळी वाळुने भरलेले एक ट्रॅक्टर, केनी आणि अन्य एक ट्रॅक्टर व एक मोटारसायकल जप्त करून ती पुढील कारवाईसाठी सिरसाळा पोलिसांच्या ताब्यात दिली. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजू वंजारे, बालाजी दराडे, सचीन अहंकारे, विकास चोपणे, रामहरी भंडाणे, अनिल मंदे यांनी केली.