Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडधान्य जादा दराने विकल्याने रामेश्वरवाडीचे रेशन दुकान निलंबीत

धान्य जादा दराने विकल्याने रामेश्वरवाडीचे रेशन दुकान निलंबीत


बीड (रिपोर्टर):- कोरोना काळात गोरगरीबांना मदत व्हावी यासाठी शासनाच्या वतीने मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. मात्र यामध्ये रेशन माफिया घोळ घालत असून मोफतचे धान्य काळ्या बाजारात विकत आहेत. रामेश्वरवाडी येथील रेशन माफियाने असाच प्रकार केला असून मोफत आलेले धान्य लोकांना विकत दिले आणि विकतचे धान्य जादा भाव लावून गरीबांना दिले. या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार येताच चौकशी करून रामेश्वरवाडीचे रेशन दुकान तडकाफडकी निलंबीत केल्याने रेशन माफियात खळबळ उडाली आहे.


रामेश्वरवाडी येथील दुकानदार बंडु आंधळे हे गोरगरीबांना धान्य देण्यास टाळाटाळ करत होते. शासनाने दिलेले मोफत धान्य ते नागरीकांना विकत देत होते. विकत आलेले धान्य जादा भावाने नागरीकांना वाटप करत होते. याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे हनुमान माळी व इतर लोकांनी रितसर तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानाची सखोल चौकशी करण्यासाठी आदेश देवून टि.बी.सिरसेवाल नायब तहसीलदार वडवणी व बी.डी.घोलप अ.का.तहसील कार्यालय पाटोदा यांचे पथक नियुक्त केले होते. त्या पथकाने रामेश्वरवाडीचे दुकान तपासून अहवाल सादर केला यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यात उचल केलेले धान्य साठा दर्शवणारा नव्हता. तक्रार नोंद वही व भेट पुस्तिका ठेवण्यात आली नव्हती. भावफलक लावलेले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत नव्हती. माहे एप्रिल 2021 मध्ये मे 2021 चे ट्रान्सेक्शन न करण्याच्या सूचना देवून ट्रान्सेक्शन केले होते. यासह आदी त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी तडकाफडकी रामेश्वरवाडी ता.केज येथील स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द केले आहे. त्यामुळे रेशन माफियात खळबळ उडाली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकानदार मोफतचा माल विकत विकत असून विकतचा माल चढ्या भावाने नागरीकांना विकत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!