मी भाजपाची, भाजपा थोडीच माझी!
पंकजा मुंडेंच्या विधानाने पुन्हा खळबळ, …तर मी ऊस तोडायला जाईल
दिल्ली (रिपोर्टर)- मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे मुंडे परिवाराच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाहीच झाले तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे. आम्हाला काही गमवायचे नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असे सूचक वक्तव्य भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात केले. दरम्यान पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघडपणे व्यक्त करून दाखविली आहे. मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी महादेव जानकरांच्या नेहमी संपर्कात असते. त्यांच्या रासप पक्षालाही मी नेहमी वेळ देत असते. महादेव जानकर तुम्ही या विषयावर बोला, त्या विषयावर पत्रकार परिषद घ्या, अशा सूचना मी नेहमी त्यांना देत असते. रासप पक्ष हा माझ्यासाठी माहेरासारखाच आहे. तर, भाजप पक्ष वडिलांसारखा आहे. वडिलांकडे काही झालच तर माहेरमध्ये माझ्यासाठी जागा आहेच ना, असे थेट वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.
पंकजा मुंडेंनी परिणामांची पर्वा न करता
निर्णय घ्यावा; संजय राऊतांचे आवाहन
मी भाजपची आहे, मात्र भाजप पक्ष माझा नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात केले. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. अशातच परिणामांची पर्वा न करता आता पंकजा मुंडे यांनी धाडसाने निर्णय घ्यावा, असे सूचक आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. माझ्यावर अन्याय होतोय, अशा नेहमीच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.