आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप
मुंबई (रिपोर्टर): पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जिवितास धोका असल्याची तक्रार महाजन यांनी पोलिसात केली आहे.
पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली होती.